महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका (Maharashtra Election Results 2019) पार पडल्या. आज या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे? राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून विविध मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यंदा निवडणुक आयोगाकडून मतमोजणीसाठी तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या दरम्यान राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसाच फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट चित्र हाती येण्याची शक्यता आहे.
राज्यातील 288 मतदारसंघातील 3237 उमेदवारांचे भवितव्य आजच्या निकालावर अवलंबून आहे. राज्यात 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे. केंद्रात जरी भाजपची सत्ता असली, तरी राज्यात जनता कोणाला निवडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्षनेत्यांनी EVM वर आक्षेप घेतल्याने, यंदा स्ट्रॉंगरूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूममधून मतपेट्या बाहेर काढणे, मतमोजणी आणि नंतर पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करणे या सर्व गोष्टींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण मत मोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचे परीवेक्षक उपस्थित राहणार आहेत.
राज्यात यंदा मतदानाचा आकडा घसरला आहे. विधानसभेसाठी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात सरासरी 61.13 टक्के मतदान झाले आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे.
2014 चा निकाल
एकूण जागा - 288
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी - 41
महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 जागा मिळवणे आवश्यक असते. एक्झिट पोलच्या निकालानुसार राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. आता नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे काही तासांतच स्पष्ट होईल.