
अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही वेळातच समोर येईल. या निकालाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असून सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. या मतमोजणी साठी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहेत. मतमोजणी सुरु झाल्यानंतर साधारण तासाभराआधी पहिल्या फेरीचा निकाल स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे. मुंबईत एकूण 36 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या सर्व ठिकाणी एकाचवेळी मतमोजणी सुरु होईल. प्रत्येक फेरीची माहिती 'रिअल टाइम' स्वरूपात आयोगाच्या अंतर्गत पोर्टलवर पडेल.
या मतमोजणीसाठी 3,000 कर्मचारी नेमण्यात आले असून प्रत्येक टेबलावर 4 कर्मचारी असतील. मुंबई शहर व उपनगरांतील 36 मतमोजणी केंद्रांवर 3,000 हून अधिक कर्मचारी यासाठी कार्यरत असतील. त्याशिवाय पोलीस कर्मचारी व निमलष्करी दले स्वतंत्र असतील.
14 टेबल, 17 ते 22 फेऱ्या
मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात एकंदर 14 टेबले असतील. एकावेळी 14 ईव्हीएम, अर्थात 14 मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी होईल. अशाप्रकारे सर्व मतांच्या मोजणीसाठी 17 ते 22 फेऱ्या होतील.
पहिल्या फेरीला थोडा विलंब
पहिल्या फेरीचा निकाल साधारणपणे तासाभरात येईल. केवळ पहिल्या फेरीला थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होत ईव्हीएममधील मतमोजणी संपेल.
पाच व्हीव्हीपॅटची मोजणी
ईव्हीएममधील मतांची मोजणी पूर्ण झाली की व्हीव्हीपॅटची मोजणी होईल. प्रत्येक मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट यंत्रांची चिठ्ठीने निवड होईल. त्या पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएममधील आणि व्हीव्हीपॅटमधील मते तपासली जातील. या सर्व प्रक्रियेनंतर पूर्ण निकाल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.
इथे पाहता येणार निकाल
या निवडणुकीचा फेरीनिहाय निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर, तसेच Voter Helpline या गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड अॅपवर पाहता येईल. मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीही येथे उपलब्ध होणार आहे.