Break The Chain Fresh Guidelines: दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये उच्चांकी कोरोना रूग्ण वाढ होत असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रशासनाने कोरोना विरूद्धची लढाई अधिक जोमाने लढण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा अशी नागरिकांना साद घालत राज्यात निर्बंध कडक केले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत आता राज्यात आज (14 एप्रिल) दिवशी रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करत संचारबंदी (Curfew) जाहीर केलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणालाही विनाकारण बाहेर पडण्यास बंदी आहे. मग या नव्या गाईडलाईन नुसार आता महाराष्ट्रातील जनतेला कोणते नियम पाळावे लागणार विवाह सोहळा, अंत्यविधी यांच्यासोबत किराणा माल खरेदी, भाजी खरेदी यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी सुरू राहणार आहेत? आणि कोणत्या गोष्टींवर बंदी असेल? हे पहा आणि त्यानुसार पुढील 15 दिवसांसाठी सज्ज व्हा. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्याकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5 हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर.
महाराष्ट्रात काल रात्री उच्चांकी कोरोनारूग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. मागील 24 तासांत 60 हजाराहून अधिक कोरोनाबाधित राज्यात आढळले आहेत. सध्या कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण वेगवान केले जात आहे. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसीवीरची अपुरी संख्या यामुळे आरोग्ययंत्रणेवरही कमालीचा ताण आहे.
महाराष्ट्रात 1 मे पर्यंतच्या कर्फ्यू काळात काय बंद असेल काय सुरू असेल?
- सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत. अपवाद श्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहारांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत परवानगी असेल.
- कार्यालयात क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी राहील. अभ्यागतांना कार्यालयामध्ये बोलवता येणार नाही. या कार्यालयातील लोकांनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घेण्याचे निर्देश आहेत.
- मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.
- जीवनावश्यक श्रेणीत रुग्णालयांसह सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय विमा कार्यालयं, औषध दुकाने, औषध कंपन्या, लसींचं उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणं, इतर पूरक उत्पादनं आणि सेवांचा समावेश राहील.
- पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यदुकानं, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह, वाण्याची, किराणा सामानाची दुकानं, भाजीपाला फळविक्रेते, दूधडेअरी, बेकऱ्या, सर्व प्रकारच्या खाद्यान्न दुकानांचाही जीवनावश्यक श्रेणीत समावेश आहे.
- शीतगृहं आणि वखार सेवा विषयक आस्थापना, सार्वजनिक वाहतूक-हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या, विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा सुरू राहणार आहेत.
- स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामांसह, सार्वजनिक कामं, ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्यक ठरवलेली सर्व कामं, सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं संचारबंदीच्या काळात सुरू ठेवण्याची परवानगी आहे.
- दूरसंवाद सेवा आणि संबंधित देखभाल दुरुस्ती, मालवाहतूक, पाणीपुरवठा विषयक सर्व कामं, शेतीशी संबंधित सर्व कामं, बी-बियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती या सर्व व्यवहारांना संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे.
- आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार, जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स, पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादनं, समुद्रातली किंवा किनारपट्टीवरील उत्पादनं, सर्व प्रकारच्या कार्गो सेवांवर टाळेबंदी लागू नाही.
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊड सेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या सेवा, सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा, विद्युत तसंच गँसपुरवठा सेवा, एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा, टपालसेवा सुरू राहतील.
- कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टन सामग्री बनवणारे कारखाने, आगामी पावसाळ्यासाठी आवश्यक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने, स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणानं जीवनावश्यक ठरवलेल्या सेवांना निर्बंधातून सूट आहे.
- टाळेबंदीतून सूट असलेले व्यवहार सुरू ठेवताना कोविड सुसंगत वागणूक ठेवणं आवश्यक राहील. नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला दंड केला जाईल. संबंधित कर्मचार्यांानी लवकरात लवकर लसीकरण करून घेणंही आवश्यक आहे.
- वाण्याचं दुकान, भाजीपाला फळविक्रेते, दूधदुकानं, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकानं; दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असतील आणि तिथे गर्दी होत असेल तर स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणं, किंवा ती तात्पुरती हलवणं वा बंद करणं आवश्यक राहील.
- टाळेबंदीच्या काळात बंद असलेल्या सर्व दुकानांनं, आस्थापना आणि कार्यालयांनी आपल्या कर्मचाऑऱ्यांचं लसीकरण करून घ्यावं तसंच टाळेबंदीनंतर कोविड संसर्ग न पसरवता कामकाज सुरू करता येईल अशा सुधारणा करून घ्याव्यात असा सल्ला देण्यात आला आहे.
- टाळेबंदीतून सवलत असलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक वाहतूक काही निर्बंधांसह सुरू राहणार आहे. ऑटोरिक्षात चालक आणि २ प्रवासी, टँक्सीत चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमते इतके प्रवासी, बसमध्ये पूर्ण प्रवासी क्षमता मात्र उभ्यानं प्रवासाला बंदी असे निर्बंध राहतील.
- प्रत्येक खेपेनंतर वाहनं सँनेटाईझ करणंही आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीनं म्हणजे बस, रेल्वे किंवा विमानानं आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल.
- टाळेबंदीतून सवलत देताना केंद्रीय, राज्य आणि स्थानिक शासकीय कार्यालय, खाजगी बँका, सूक्ष्म वित्तीय संस्था, ज्यांची सुनावणी सुरू आहे अशा वकिलांची कार्यालयं यांचा समावेश अपवादात्मक श्रेणीत करण्यात आला आहे.
- खाजगी बसेस सह सर्व खाजगी वाहनं फक्त आपत्कालीन स्थितीत वाहतूक करू शकतात. एखाद्या रास्त कारणासाठीही त्यांना वाहतूक करता येईल. विनाकारण वाहतूक केल्यास एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल.
- उपाहारगृह, बार, हॉटेल यांना फक्त घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी असेल. कोणत्याही उपाहारगृह किंवा बारला भेट देऊन ऑर्डर देता येणार नाही. निवासी हॉटेल मधील उपाहारगृह आणि बार फक्त आतील पाहुण्यांसाठी सुरू राहतील. खाद्य पदार्थांच्या घरपोच सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावं लागेल.
- निर्यात करण्यासाठीचे सामान बनविणारे कारखाने ज्यांना माल बाहेर पाठवायचा आहे. ज्या कारखान्यांमध्ये एकदम काम थांबवता येणार नाही आणि जास्त वेळ लावल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरू होऊ शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना ५० टक्के क्षमतेसह काम करता येईल.
- बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी, कामगारांनी निवास करणे अत्यावश्यक राहील. संबंधितांना आत-बाहेर करण्यास मज्जाव करण्यात आला असून, केवळ साहित्याची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- मनोरंजनगृह, सवलत नसलेली दुकानं, मॉल, शॉपिंग सेंटर, सिनेमा हॉल, नाट्यगृह, सभागृह पूर्णपणे बंद राहतील. समुद्र किनारे, जलक्रीडा केंद्र, उद्याने, व्हिडिओ गेम, पार्लर बंद राहतील. क्लब, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद राहतील.
- चित्रपट, चित्रवाणी मालिका, जाहिरातींसाठीचं चित्रीकरण बंद राहील. धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद राहतील. मात्र तिथले कर्मचारी त्यांची दैनंदिन कर्तव्ये करू शकतील.
- सौंदर्य प्रसाधन केंद्र, केश कर्तनालये सुरू ठेवण्यासही परवानगी नाही.
- टाळेबंदीच्या काळात सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील. दहावी आणि बारावी परीक्षांशी संबंधित बाबीपुरती या नियमात सूट देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील.
- कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका नियोजित आहेत, तिथे राजकीय सभांना सशर्त परवानगी देण्यात येईल.
- टाळेबंदीच्या काळात विवाह समारंभ कमाल केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यास परवानगी असेल. मंगल कार्यालय किंवा विवाह समारंभ स्थळी अभ्यागतांना सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करणं आवश्यक असेल अन्यथा त्यांनी वैध असणारे कोरोना बाधित नसल्याचं वैध प्रमाणपत्र बाळगणं बंधनकारक राहील. अंत्यविधीस कमाल 20 लोकांना उपस्थित राहता येईल.
- कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आल्यास ही गृहनिर्माण संस्था “सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र” म्हणून घोषित केली जाईल.
दरम्यान ज्या व्यक्तींना बाहेर पडण्याची मुभा आहे त्यांना मास्कचा चेहर्यावर योग्यप्रकारे वापर करणं बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करणं, हात वारंवार नीट धुणं आवश्यक आहे.