कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये-शाळा अजून नियमितपणे सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. या संदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठी घोषणा केली आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या 20 जानेवारीपासून 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये (Colleges) सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घेणे गरजेचे आहे.
सर्व महाविद्यालये नियमित सुरु करण्यास थोडा वेळ लागेल. कारण महाराष्ट्राभोवती नव्या कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात फैलाव होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.
तर दुसरीकडे प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत पुढे असेही सांगितले की, "तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व अभ्यासक्रमांना 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी प्रवेशांना ही सोमवार, मंगळवार या दिवशी आणखी 2 दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
एकंदरीत लवकरच राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याच्या धर्तीवर आहेत. यामुळे वर्षाची शेवटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांना देखील सोपे जाईल. हे सर्व ठरल्यानुसार होण्याप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग यांसारख्या गोष्टींकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.