महाराष्ट्रामध्ये आज राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या (Maharashtra SSC Exam) परीक्षेला सुरूवात झाली आहे. कोविड 19 संकटानंतर यंदा पहिल्यांदा बोर्ड परीक्षा पुन्हा पहिल्याप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जात आहेत त्यामुळे मागील 2-3 वर्ष ऑनलाईन अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांची यंदा पहिल्यांदाच पूर्ण वेळ लेखी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातून 9 विभागात आजपासून या बोर्ड परीक्षेला (Board Exams) सुरूवात होत आहे. पण यंदा कॉपी आणि परीक्षेशी निगडीत अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने काही नियमांमध्ये बदल केले आहेत.नक्की वाचा: Maharashtra Board SSC HSC Exam 2023: यंदा 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर न पोहचल्यास मुकावं लागू शकेल पेपर ला; नियमांत बदल.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षेला 10 मिनिटं आधी पेपर दिला जाणार नाही तसेच परीक्षेची वेळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देखील मिळणार नाही. पण पेपरच्या शेवटी मात्र निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं अधिकचा वेळ दिला जाणार आहे. 2 मार्चपासून सुरू होणारी ही परीक्षा 25 मार्च पर्यंत चालणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Board Exams 2023: पुण्यात परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक; जिल्हाधिकार्यांनी दिले इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे निर्देश .
परीक्षेला जाताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक यंत्र घेऊन जाण्यास परवानगी नसेल. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मात्र घेऊन जाणं बंधनकारक आहे. तसेच आता बोर्ड परीक्षेच्या केंद्रावर 50 मीटरच्या भागामध्ये फोटो कॉपी सेंटर, इंटरनेट व्यवस्था बंद ठेवण्याचाही निर्णय झाला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांशिवाय कर्मचारी आणि पोलिस वगळता अन्य कोणालाही घोळक्यात एकत्र राहण्यास मज्जाव केला जाणार आहे. आजपासून सुरू झालेल्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोलिस ताफा देखील सज्ज ठेवला जाणार आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.