Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

महाराष्ट्रामध्ये यंदा 10वी, 12वीच्या परीक्षांदरम्यान कॉपीची प्रकरणं रोखण्यासोबतच गैरप्रकार टाळण्यासाठी नियमावली कडक करण्यात आली आहे. बोर्डाने 100 मीटरच्या परिसरामध्ये फोटोकॉपी सेंटर्स (Photocopy Centers) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात जिल्हाधिकार्‍यांनी आता परीक्षा केंद्र परिसरामध्ये इंटरसेवा (Internet Service) देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हातील ग्रामीण भागात 10 वी, 12वी परीक्षेच्या वेळेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून  इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात म्हणून 21 फेब्रुवारी पासून 25 मार्च पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवली जाणार आहे. सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

पुण्यात परीक्षा केंद्रांवर 100 मीटरच्या परिसरात विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक यांच्याव्यतिरिक्त अन्य लोकांना प्रवेश नसेल. पोलिस कर्मचारी आणि अधिकारी वगळता अन्यांना दोन किंवा दोन पेक्षा अधिक जण एकत्र येण्यास मज्जाव आहे.  या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. नक्की वाचा: Maharashtra Board SSC HSC Exam 2023: यंदा 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर न पोहचल्यास मुकावं लागू शकेल पेपर ला; नियमांत बदल.

महाराष्ट्रात यंदा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे तर 10वीची परीक्षा 2 मार्च पासून सुरू होणार आहे. कोविड संकटानंतर पहिल्यांदा बोर्डाची परीक्षा पुन्हा पूर्वीप्रमाणे कोणत्याही कोविड 19 निर्बंधांशिवाय पार पडणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढवून द्यावा या मागणीसाठी पालकांनी मुंबईमध्ये नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पालकांनी यावेळी कोविड संकटादरम्यान ऑनलाईन शिक्षण झाल्याने विद्यार्थ्यांची लेखनाची सवय मोडली आहे. आणि मुलांचे बोर्ड परीक्षेतील नुकसान टाळण्यासाठी वेळ वाढवून मिळावा अशी मागणी आहे.