आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2019) पार पडली असून या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल येत्या 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. परंतु, या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एक्झिट पोलबाबतची (Exit Poll) उत्सुकता वाढली आहे. पण एक्झिट पोलमधील अंदाज प्रत्यक्षात कितपत खरे ठरतात, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतात. काही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलमधील अंदाज चुकल्याचे समोर आले आहे. कोणकोणत्या निवडणुकीत एक्झिट पोलचा अंदाज चुकाला होता, जाणून घेऊया याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे-
लोकसभा निवडणूक 2004
भाजपने लोकसभा निवडणूक 2004 मध्ये इंडिया शायनिंग मोहीम राबवली होती. तसेच निवडणुकीत अटल बिहारी वायपेयी यांचा विजय होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी भाजपच बाजी मारेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच भाजपप्रणित एडीएला 543 जागांपैकी 230 ते 275 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून लावण्यात आला होता. परंतु त्यावेळी या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत एनडीएला केवळ 185 जांगावर विजय मिळवता आला होता. तर यूपीएला तब्बल 218 जागा मिळवल्या होत्या. निकालानंतर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, डावे पक्ष यांनी काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा दिला होता.
विधानसभा निवडणूक 2014
विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीला अत्यंत महत्व दिले जात होते. कारण, मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर जनतेला काय वाटते, या दृष्टीने भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्याचबरोबर दिल्लीत स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची संधी आपकडे क्षमता होती आणि 15 वर्षांच्या सत्तेनंतर दिल्लीत काँग्रेसची स्थिती काय आहे अशा प्रश्न नागरिकांच्या आवतीभोवती फिरत होते. त्यावेळी आम आदमी पक्षाला 40 ते 45 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. परंतु, निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जोरदार धक्का दिला होता. निकालानंतर आदमी पक्षाने तब्बल 67 जागांवर विजय मिळवला होता. आप पक्षाला एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा तब्बल 22 जागा जास्त मिळाल्या होत्या.
विधानसभा निवडणूक 2015
बिहारमध्ये एकूण 243 मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरुद्ध महाआघाडी अशी लढत होती. दरम्यान, एनडीए ला 100 ते 127 जागा मिळतील तर, महाआघाडीला त्यापेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण त्यावेळीही एनडीएला केवळ 58 जागांवर विजय मिळवता आला होता तर, महाआघाडीने बहुमताचा आकडा सहज ओलांडला होता.
आज पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. तसेच एक्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नसून केवळ एक अंदाज आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे