महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) युतीमधील जागावाटप या बहुचर्चित प्रश्नावर अखेरीस उद्या उत्तर मिळण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, उद्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये एक खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागावाटप जाहीर करण्यात येईल. तत्पूर्वी आज, मातोश्री (Matoshree) येथे शिवसेना आमदारांची एक खास बैठक घेण्यात येणार असल्याचे समजत आहे तर वर्षा (Varsha) बंगल्यावर देखील भाजपा आमदारांच्या उपस्थितीत युतीसंदर्भात चर्चा होईल असे वृत्त आहे.
शिवसेना भाजपा युतीचे जागावाटप आणि युती जिंकून आल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हे प्रश्न बऱ्याच काळापासून चर्चित आहेत. विधानसभेचे बिगुल वाजताच दोन्ही पक्षांनी आलिप्तरित्या प्रचाराला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेतून भाजपाने तर जनाशीर्वाद यात्रेतून शिवसेनेने राज्यव्यापी दौरा आरंभला होता. यानंतर मध्यंतरी जागावाटप संदर्भात अनेक अंदाज वर्तवणारे वृत्त माध्यमांमध्ये पाहायला मिळत होते.
अशातच शिवसेना खासदार संजय राउत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पक्षाला 144 जागा न दिल्यास भाजप सोबत युती तोडणार असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दोन्ही पक्षाला समसमान जागा वाटप होणार असल्याचे म्हटले होते. असं असलं तरी युती निवडून आल्यास फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे देखील अमित शहा म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत यापैकी 44 जागा या युतीशी संलग्न मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत, उर्वरित 244 जागांवर शिवसेना आणि भाजपा मधील कोणत्या उमेदवारांची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील निवडणुकांमधील या जागांचा इतिहास, सध्या सोबत असणारे उमेदवार आणि नव्यने पक्षात दाखल झालेली मंडळी यांचा अभ्यास करून उद्या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होऊ शकते.