महाराष्ट्रात भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता येणार,निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री: अमित शाह
BJP National President Amit Shah | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात भारतीय जनता पक्ष कलम 370 च्या मुद्द्याने होत आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल. निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील, असे सांगत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपला विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात करुन दिली. अमित शाह हे आज (22 सप्टेंबर 2019) मुंबई दौऱ्यावर असून, गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को (Nesco Hall) सभागृहात त्यांनी  महाराष्ट्र भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अमित शाह यांनी या वेळी कलम 370 वर विस्ताराने भाषण केले.

कलम 370 वरुन अमित शाह यांनी काँग्रेस, पंतप्रधान नेहरु आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अमित शाह म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल सांगतात की, जम्मू काश्मीरमधील कलम 370 हा मुद्दा राजकीय नाही, पण, हा खरा राजकयीच आहे. राहुल गांधी आपण राजकारणात अलिकडे आलात. मी आपल्याला सांगू इच्छितो की, हा मुद्दा राजकीयच आहे. दिल्ली करार हा कलम 370चा पाया आहे. भारत पाकिस्तान युद्धात नेहरुंनी युद्धबंदी जाहीर केली त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीर जन्माला आला. कलम 370 मुळे देशात दहशतवाद पसरला. कलम 370 ही नेहरुंचीच चूक आहे, असा घणाघातही अमित शाह यांनी या वेळी केला.

कलम 370 मुळेच पंडीतांना जम्मू-काश्मीर सोडून जावे लागले. पंडीतांना हुसकाऊन लावले गेले. कलम 370 मुळेच देशात दहशतवाद पसरला. आता 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. काँग्रेस आणि विरोधकांकडून संसदेत भाषणाच्या माध्यमातून भीती दाखवण्यात येत होती की, हे कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पसिस्थीती बदलेन. रक्ताचे पाट वाहिले जातील. पण, मी आपल्याला सांगू इच्छितो की, हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एक गोळीही चालवावी लागली नाही. (हेही वाचा, मुंबई: अमित शाह यांची गोरेगाव येथे नेस्को सभागृहात सभा)

एएनआय ट्विट

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमधे विकास पोहोचविण्यास मदत झाली. हे कलम हटविण्याच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरमधील जनतेलाल आरक्षण, अॅट्रीसीटी आदी गोष्टींचा लाभ घेता येईल. काश्मीरमधील जनतेला आता विकास म्हणजे नेमकं काय हे कळू शकेन. केंद्रातून जाणारा निधी आता थेट काश्मीरच्या जनतेपर्यंत पोहोचेल. या आधी काश्मीरच्या जनतेला केंद्र सरकारकडून जाणारा सगळा पैसा काही लोकांकडेच जात होता, आता तसे होणार नाही, असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले जाणे आवश्यक असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, राहुल गांधी आपण विरोध का करत होता? असा सवालही शाह यांनी या वेळी केला.  विधानसभा निवडणूकीत कलम 370 हा प्रचाराचा मुद्दा बनविण्याची भाजपची रणनिती आहे. ही रणनिती अधिक प्रभावीपणे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी याचा पूरेपूर प्रयत्न आपल्या भाषणातून अमित शाह यांनी केला.