Voting Image used for representational purpose (Photo credits: PTI)

सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2019) राज्यात 288 जागांसाठी मतदान पार पडले. परंतु, नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातील (Nandurbars Akkalkuwa Assembly Constituency) मणीबेली गावातल्या (Manibeli Village) एका मतदारानेच आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर आली आहे. या गावाची एकूण लोकसंख्या 1300 असून गावात केवळ 328 नोंदणीकृत मतदार आहेत. त्यातील 327 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून फक्त एकाच मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दिली आहे.

सहदेव दळवी या एकमेव व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क बजावला. दळवी यांची निवडणूक अधिकाऱ्यांनी समजूत घातली होती. त्यामुळे त्यांनी मतदान केले, अशी माहीती गावातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण गावात जाऊन गावकऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, यात निवडणूक अधिकाऱ्यांना यश आलं नाही.

हेही वाचा - महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आघाडीचा पराभव झाल्यास काँग्रेस जबाबदार असणार, राष्ट्रवादी पक्षाच्या माजिद मेमन यांच्या विधानाने खळबळ

का टाकला मतदानावर बहिष्कार ?

नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघ हा सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे बाधित झालेला आहे. या मतदारसंघातील गावात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत वीज, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची योग्य सोय नाही. त्यामुळे येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गावात पायाभूत सुविधांची सोय नसल्यामुळे मतदारांनी 15 ऑगस्ट रोजी ठराव करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सरदार सरोवर धरणात 17 सप्टेंबरला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे येथील लोकांची घरे पाण्याखाली गेली होती. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 25 घरांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. या सर्व गोष्टींमुळे मतदारांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला.

हेही वाचा - Maharashtra Assembly Election 2019: मतदानानंतर ‘असा’ असतो ईव्हीएमचा प्रवास

सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज, कलाकार तसेच वयस्कर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पंरतु, गावातील विकासामुळे मणीबेली गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. सरकार मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देत असते. मात्र, सरकार जनतेला लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्यात अपूरे ठरते. निवडणुका आल्यानंतर राजकीय नेते केवळ आश्वासने देतात. मात्र, निवडून आल्यानंतर विकासकामे करत नाहीत. मणीबेली गाव हे याचे उत्तम उदाहरण आहे.