महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आघाडीचा पराभव झाल्यास काँग्रेस जबाबदार असणार, राष्ट्रवादी पक्षाच्या माजिद मेमन यांच्या विधानाने खळबळ
माजिद मेमन (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. त्यानंतर आता या निवडणूकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याचे एक्झिट पोलच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते माजिद मेमन (Majeed Memon) यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने समोपचाराने चर्चा करुन जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. यामध्ये दोन्ही पक्ष प्रत्येक प्रत्येकी 125 जागा मिळणार आहे. तर आघाडीतील 11 मित्रपक्षांना 38 जागा देण्याचा निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तर सोमवारी पार पडलेल्या मतदानाचा निकाल येत्या 24 तारखेला जाहीर केला जाणार आहे. पण जर विधानसभेत आघाडीचा पराभव झाल्यास काँग्रेस याला जबाबदार असेल असे माजिद मेमन यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा दौरे केले पण त्यांच्या नेत्यांनी काहीच मेहनत निवडणूकीच्या दौऱ्यासाठी केली नाही. त्यामुळे जर राष्ट्रवादीचा पराभव निवडणूकीत झाल्यास काँग्रेस त्याला सर्वस्वी जबाबदार ठरणार असल्याचे मेमन यांनी विधान केले आहे. तर येत्या 24 तारखेला निवडणूकीच्या निकालाचे आकडे स्पष्ट होणारच आहेत.(भाजप-शिवसेना नेतृत्व टेन्शनमध्ये? मतदानाचा टक्का घटला, बंडखोर आडवणार युतीच्या विजयाची वाट? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस करणार सत्तावापसी?)

तसेच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी पक्षाला गळती लागल्याचे दिसून आले. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या हाती अपयश आले होते. एवढेच नव्हे तर, लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांनी राष्ट्रवादीचा पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघात मतदान पार पडले असून कोणची सत्ता पुन्हा येणार यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे.