देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहे. तसेच राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये विभागणी करण्यात आली असून कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडॉउनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारने 4 मे रोजी दारुची दुकाने सुरु होणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी मद्य प्रेमींनी दारुच्या दुकानाबाहेर भल्यामोठ्या रांगा लावण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आल्याने तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच दरम्यान नाशिक नंतर आता अमरावती (Amravati) मधील ग्रामीण भागात दारुची दुकाने सुरु करण्यात आली आहेत.
अमरावती मधील ग्रामीण भागात दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकाने जशी सुरु केली त्याच एका दिवसात तब्बल 63 हजार लीटर दारुची विक्री झाली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन विभागाकडे 75 लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने कंन्टेंटमेंट आणि रेड झोन वगळता सर्वत्र दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दारुच्या दुकानाबाहेर गर्दी पाहता तो निर्णय मागे घेतला आहे. तर महाराष्ट्रात 48 कोटीच्या पार दारुची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली होती.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसचे 1089 नवीन रुग्ण; राज्यात एकूण बाधितांची संख्या 19063 वर, मुंबईमध्ये 11,967 संक्रमित लोक)
#अमरावती जिल्ह्यात #लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. कालपासून ग्रामीण भागातील दारू दुकाने सुरू केल्यामुळे केवळ एका दिवसातच ६२ हजार लिटर दारूची विक्री झाल्याने #राज्य उत्पादन विभागाचा ७५ लाख रुपयांचा महसूल जमा झालेला आहे.@InfoAmravati
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 9, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. त्याचसोबत पोलीस दलातील कर्मचारी ही अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.