Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसचे 1089 नवीन रुग्ण; राज्यात एकूण बाधितांची संख्या 19063 वर, मुंबईमध्ये 11,967 संक्रमित लोक
Coronavirus outbreak in India (Photo Credits: IANS)

देशातील, मुख्यत्वे महाराष्ट्रा (Maharashtra) मधील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. आज महाराष्ट्रामधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 1089 इतकी झाली, यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 19063 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 3470 लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुणे येथे सर्वाधिक कोरोणाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातल्या त्यात मुंबईच्या झोपडपट्टी परिसरातील परिस्थिती अजूनच गंभीर आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावी येथे आज कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळले. धारावीमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या 808 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 748 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली व यासह एकूण रुग्णसंख्या 11,967 वर पोहोचली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 25, पुण्यातील 10, जळगाव जिल्ह्यात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 19  पुरुष तर 18 महिला आहेत. गुरुवारी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात 77 कैदी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. जेलचे 26 कर्मचारीदेखील संक्रमित आहेत. (हेही वाचा: 'संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर, मुंबईमध्ये लष्कर येणार नाही'; जाणून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे)

दरम्यान, सध्याच्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी मुंबईमध्ये लष्कर येणार नसल्याची महत्वाची बातमी दिली. तसेच त्यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यात यश आले नसल्याचेही सांगितले. आजच्या संवादामध्ये त्यांनी पोलिसांबाबत एक महत्वाचा निर्णय घेत, सध्याच्या पोलिसांना थोडी विश्रांती देण्यासाठी, केंद्राकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.