सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) बाबत महाराष्ट्राची (Maharashtra) परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अनेक उपाययोजना राबवूनही दिवसेंदिवस मुंबई (Mumbai) व राज्यातील इतर भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त (BMC Commissioner) प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांची बदलीही करण्यात आली आहे. आज कोरोना विषाणू परीस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. संवादाची सुरुवात त्यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या उल्लेखाने केली. महाराष्ट्रामधील मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली, त्यावेळी सर्वांनी योग्य सूचना दिल्या, या बैठकीत राजकीय पक्षांची एकजूट दिसून आली असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी औरंगाबाद येथे घडलेल्या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले. ही घटना दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी मजुरांना दिलासा दिला. महाराष्ट्र सरकार मजुरांची योग्य काळजी घेत आहे व काळजी घेईल असेही ते सांगितले. तसेच मजुरांना जिथे जिथे जायचे असेल तिथे जाण्यासाठी केंद्र सरकार व त्या-त्या राज्यांशी चर्चा करून ट्रेन्सची व्यवस्थाही केली जात आहे. मात्र या ठिकाणी गर्दी करू नये, संयम बाळगा, आम्हाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये लष्कर येणार या अफवेबाबत भाष्य केले. 'ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे, आपल्याला लष्कराची आवश्यक नाही, इथे लष्कर येणार नाही,' असे त्यांनी सांगितले. हे संकट गंभीर असले तरी सरकर खंबीर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जिथे जिथे राज्यात केंद्र सरकरच्या यंत्रणा आहे, त्यांचे डॉक्टर्स व हॉस्पिटल्सची मदत देण्याची तयारी केंद्राने दर्शवली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सायन रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराविषयी बोलताना, त्यांनी हॉस्पिटलमधील गलथानपणा अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांबाबत एक महत्वाचा निर्णय घेत, सध्याच्या पोलिसांना थोडी विश्रांती देण्यासाठी, केंद्राकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. (हेही वाचा: महाराष्ट्र: राज्यात लॉकडाउन सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत 98 हजार गुन्ह्यांची नोंद तर 686 जणांना अटक- अनिल देशमुख)
त्यानंतर त्यांनी या विषाणूचा संसर्ग कायमचा रोखण्यासाठी याची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली. यासाठी नागरिकांनी नियम पाळत आम्हाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले. आजच्या घडीला महाराष्ट्रात जवळ जवळ 18 हजार कोरोनाचे रुग्ण आहे, मात्र सव्वातीन हजार लोकही बरे झाले आहेत व ही सकारात्मक बाब असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिक जवान आहे, तो या संकटाशी लढेल, नियमाचे पालन करेल, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांची शिकवण आचरणात अनेक, असे आत्मविश्वासपर उद्गारही काढले.
आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांनी या संकटकाळात मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.