Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सद्यची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे वांरवार आवाहन करण्यात येत आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स अहोरात्र उपचार करत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. या लॉकडाउनच्या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. मात्र तरीही काही ठिकाणी नागरिक विनाकारण फिरताना दिसून येत असून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. याच कारणास्तव लॉकडाउनपासून ते आतापर्यंत राज्यात 98 हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर 686 जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्यातील पोलिसांवर हल्ले केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तरीही पोलिसांवर हल्ले केल्याच्या 190 घटना समोर आल्या आहेत. नागरिकांच्या विरोधात कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. तर विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत.(नवी मुंबई: वाशी मधील AMPC मार्केट येत्या 11 मे पासून बंद राहणार)

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्या पार गेला आहे. तर राज्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला आपल्या राज्यात परत पाठवण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. या कामगारांना श्रमिक स्पेशल ट्रेनने त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे.