पुण्यातील (Pune) धायरी (Dhayari) भागात शुक्रवारी संध्याकाळी एका नवविवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhgad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मृत महिलेचा पती पसार झाला आहे. त्यानेच आपल्या मुलीची हत्या केली आहे, असा आरोप मृत महिलेचे नातेवाईक करीत आहेत. मात्र, ही आत्महत्या आहे की हत्या? हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निशा अजय निकाळजे (वय 19) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. निशाचे अजय (वय, 21) सोबत प्रेमसंबंध असून गेल्या चार महिन्यांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघे सुरुवातीला जनता वसाहत येथे राहत होते. मात्र, तेथून वडगाव धायरी येथे राहण्यास आले. त्या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, शुक्रवारी निशाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर अजय पसार झाला आहे. निशाच्या नातेवाईकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरुन अजयविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, निशाची हत्या झाली की अन्य कोणत्या कारणाने तिचा मृत्यू झाला आहे? हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. हे देखील वाचा- मुंबई: माटुंगा भागात भाजी विक्रेत्याला मारहाण प्रकरणी 3 जण अटकेत; Viral Video नंतर कारवाई
निशाला मोबाईलवर बोलण्याची सवय होती. यामुळे निशा आणि अजय या दोघांत सतत खटके उडायचे. याच वादातून अजयने शुक्रवारी रात्री निशाचा गळा आवळून तिची हत्या केली आहे, असा आरोप निशाच्या नातेवाईकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवीदास घेवारे तपास करीत आहेत.