'गणपती दूध पितो', 'समुद्राचे पाणी गोड झाले' यांसारख्या अनेक अफवा यापूर्वी आपण पाहिल्या आहेत. मुळात या अफवाच असल्याने त्यातील फोलपणा पुढच्या काहीच वेळात पुढे आला. असे असले तरीही अनेकदा अशाच अफवा वारंवार पुढे येतात आणि त्याला लोकही भूलतात. अशीच एक घटना अकोला (Akola) शहराजवळ असलेल्या अकोली बुद्रुक येथील शिव मंदिरात (Shiva Temple Akola) पाहायला मिळाली. शिव मंदिरात (Shiva Temple) असलेल्या महादेव पिंडीला (Mahadev Pind) अचानक डोळे आल्याची अफवा पसरली. ही अफवा नागरिकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी तातडीने मंदिराकडे धाव घेतली. प्रामुख्याने महिलांनी मंदिरात विशेष गर्दी केली.
शिव मंदिरातील महादेव पिंडीला अचानक डोळे आले आहे. महादेवाने तिसरा डोळा उघडला आहे, अशी अशी अत्यंत निराधार चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. परिणामी मंदिर आवार गर्दीने गजबजून गेले आहे. या गर्दीत हौशे, नवशे, गवशे असे नाना तऱ्हेचे लोक पाहायला मिळत आहेत. अनेक महिला तर श्रद्धेपोटी पूजेचे ताट घेऊन मंदिरात दाखल झाल्या आहेत. काही नागरिकांनी मात्र असा काही प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र हा प्रकार केवळ अफवा आहे. त्याला वास्तवतेचा कोणताही अधिकार नसल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Maha Shivratri - महाशिवरात्रीची तारीख, महत्त्व आणि पूजा विधी पद्धत, जाणून घ्या)
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अकोला येथील अकोली बुद्रुक येथे शिव मंदिर नव्यानेच स्थापन झाले आहे. या मंदिरात महादेवाची आरती दररोज सायंकाळी केली जाते. गाव आणि परिसरातील महिला या मंदिरात महादेवाच्या पिंडीला दिवाबत्ती करत असतात. दरम्यान, या ही पूजा करत असतानाच काही महिलांनी दावा केला की, महादेवाच्या पिंडीला डोळे आले आहेत. मोजक्याच महिलांनी केलेल्या दाव्यानंतर ही माहिती गाव आणि परिसरातील इतरही अनेक महिलांपर्यंत पोहोचली. जसजशी माहिती कळत गेली तसतसे महिलांनी मंदिरात आणि मंदिर आवारात गर्दी केली. गावातील पुरुष मंडळीही मग मागे राहिले नाहीत. त्यांनीही मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली.