
Lok Sabha Election 2024: आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकासआघाडीचाही (Maha Vikas Aghadi) यात अपवाद नाही. काहीही करुन या वेळी भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचेच हा चंग बांधून मविआ मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी आज (28 जून) मविआतील नेत्यांची एक बैठक पार पडत आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र भाजपही निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागला आहे. त्यानुसार बुथ पातळीवर काम सुरु झाले आहे. उल्लेखनिय म्हणजे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात विशेष सक्रीय झाला आहे. पाठिमागील काही महिन्यांपासून चंद्रशेखर राव यांचा दौरे महाराष्ट्रात वाढले असून, पक्षप्रवेशही सुरु झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात हळूहळू निवडणुकांचा ज्वर वाढू लागत असल्याचे पाहायला मिळते आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांतर्गत तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विचारविनिमय करुन आगोदर कोणकोणत्या जागा आपल्याला लढता येतील. त्यावर आपले जिंकण्याची शक्यता किती आहे याचा विचार केला जातो आहे. त्यानंतरच पुढे कोणत्या जागांवर दावा करायचा याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, "जनता तुमच्या ‘ मेरा घर - मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही", चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर)
दरम्यान, अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडणाऱ्या बैठकीस शिवसेना (UBT) कडून संजय राऊत, काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कडून काही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पाठिमागच्या निवडणुकीचा विचार करायचा तर महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली होती. ती चंद्रपूरची होती. महत्त्वाचे असे की, जी जागा काँग्रेसने जिंकली होती ती बाळू धानोरकर यांच्या रुपात जिंकली होती. बाळू धानोरकर हे पूर्वी शिवसेनेतच होते. शेवटच्या टोकात त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला धानोरकर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे आता ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काय सूत्र ठरते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.