Lumpy Skin Disease प्रतिकात्मक प्रतिमा | Twitter

Lumpy Skin Disease: पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) च्या वेगवेगळ्या भागात गेल्या दहा दिवसांत 12 जनावरांना लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) झाल्याचे आढळले आहे. यामुळे शहरातील पशुधन क्षेत्रासमोर एक नवीन आरोग्य आव्हान उभे राहिले आहे. विषाणूजन्य संसर्गामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि राज्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे होणारा लम्पी स्किन डिसीज हा संसर्गजन्य स्वरूपाचा आजार आहे. तो संक्रमित प्राण्यांशी थेट संपर्क साधून आणि दूषित चारा किंवा पाण्याच्या स्त्रोतांमधून देखील पसरू शकतो.

लम्पीचा संसर्ग झाल्यानंतर संक्रमित प्राण्यांच्या त्वचेवर सामान्यतः गाठी तयार होतात, त्यासोबत उच्च ताप येतो, जनावरांच्या हातपायांना सूज येते, नाक आणि डोळ्यांतून स्त्राव होतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये लंगडेपणा येतो. भूक कमी होणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत, ज्यामुळे दुग्ध उत्पादन कमी होते. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पहिले पाऊल म्हणून, प्रभावित भागात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत 1500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Stray Cow Attack In Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी (Watch Video))

दरम्यान, पीसीएमसी अधिकाऱ्यांनी पशुधन मालकांना सल्ला दिला आहे की जर कोणत्याही प्राण्यामध्ये लक्षणे दिसली तर त्वरित कारवाई करावी. पुढील प्रसार रोखण्यासाठी संक्रमित प्राण्यांना निरोगी प्राण्यांपासून वेगळे करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना प्रभावित गावांमधील प्राण्यांना सामान्य कुरणात चरायला देण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. तथापी, विषाणूच्या कीटकजन्य प्रसाराला तोंड देण्यासाठी, अधिकाऱ्यांनी माश्या, डास आणि गोचीड यांसारख्या सामान्य वाहकांना लक्ष्य करून पशुवैद्यकीय मान्यताप्राप्त कीटकनाशकांची फवारणी करण्याची शिफारस केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड प्रदेशात गायी, म्हशी, बैल, घोडे आणि उंटांसह 2400 हून अधिक पाळीव प्राणी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षणीय आहे. पशुवैद्यकीय तज्ञांच्या मते, बाधित जनावरे लवकर ओळखले गेले आणि योग्य काळजी घेतली गेली तर लम्पी आजार प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.