Lok Sabha Election 2024: नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध; नवी मुंबई, भाईंदर मध्ये पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे
BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महायुती कडून शिवसेनेच्या नरेश म्हस्के (Naresh Mhaske)  यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपा कडून नाराजी बोलून दाखवली जात आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजपाकडून माजी खासदार संजीव नाईक दुसर्‍यांदा इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. नरेश म्हस्के यांना नवी मुंबईमधून सहकार्य करायचे नाही, अशी भूमिका संजीव नाईक समर्थकांनी घेतली आहे. भाजपाचे माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मंडल, बूथ संघटक आणि वॉरियर्सने पदाचे राजीनामे दिले आहेत. आज त्यांनी प्रदेश पक्ष कार्यालयाबाहेर देखील ठिय्या आंदोलन केले आहे.

दरम्यान नरेश म्हस्के या गोष्टीनंतर भाजपा कार्यालयात पोहचले आहेत. त्यांच्याकडून भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक आणि सरचिटणीस-ध्रुव किशोर पाटील यांच्यासह भाजपच्या मीरा-भाईंदर युनिटशी संबंधित सुमारे अर्धा डझन अधिका-यांनी आज आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. “आमच्या पक्षाचे सदस्य या घोषणेने नाराज आहेत हे खरे आहे. मात्र, निर्णय होऊन महायुतीचा विजय निश्चित करायचा असल्याने मी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे."अशी प्रतिक्रिया संजीव नाईक यांनी दिली आहे.

संजीव नाईक यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांचे शिवसेना प्रतिस्पर्धी विजय चौगुले यांचा 49,020 मतांनी पराभव केला होता, परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते सेनेच्या राजन विचारे यांच्याकडून 2.81 च्या फरकाने पराभूत झाले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ठाणे, ऐरोली आणि बेलापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. उद्या नरेश म्हस्के लोकसभेसाठी आपला अर्ज सादर करणार आहेत. त्यापूर्वी आज भाजपा कडून नाराजी व्यक्त केली जात आहे. Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली Raj Thackeray यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट! 

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे लोकसभेसाठी ते या जागेवर आग्रही होते. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.