महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काल (28 मे) दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 50% टोळधाडीचा (Locust Attack) नाश करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून राज्यात अग्निशमन दलाच्या गाड्या वापरून जंतूनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान सरकारकडून टोळधाडीचा प्रभाव असलेल्या भागामध्ये शेतकर्यांना केमिकल्स, जंतूनाशकं मोफत दिली जात असल्याची माहिती देखील कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
दरम्यान मध्य प्रदेशातून विदर्भात अमरावती, भंडारा जिल्ह्यात आलेल्या टोळींना हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जंतूनाशकांची फवारणी केल्याचं चित्र पाहण्यात आलं होतं. तर अनेक शेतकर्यांनी टोळधाडींना हुसकावून लावण्यासाठी ढोल आणि पारंपारिक वाद्यांचा वापर केल्याचंही पहायला मिळालं. अजित पवार यांनी देखील ड्रोनच्या माध्यमातून जंतू नाशकांची फवारणी केली जाईल असं म्हटलं आहे. Locust Attack In Maharashtra: भंडारा पाठोपाठ टोळधाडीचा गोंदिया मध्ये शिरकाव; प्रशासनाने सतर्क राहण्याचा दिला इशारा.
भारतामध्ये प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यामध्ये टोळीधाडीचा प्रादुर्भाव पहायला मिळाला आहे. उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान मध्येही टोळधाडी पिकांवर दिसल्या. त्यानंतर काल केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग थोमर यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावत टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजानांचा आढावा घेतला आहे. यामध्ये ज्या राज्यात टोळधाडीने नुकसान झालं आहे तेथे अॅडव्हायजरी पाठवण्याचे, प्रशासनाला, शेतकर्यांना दक्ष राहण्याचे इशारेदेखील देण्यात आले आहे. पुढील 15 दिवसांमध्ये ब्रिटनमधून 15 स्पेअर्स येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
केंद्रीय कृषीमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महिना- दीड महिन्यात 45 अधिक स्प्रे बनवले जातील. तर टोळधाडीचं संकट दूर ठेवण्यासाठी उंच झाडं, सहज पोहचू शकत नाही अशा भागामध्ये जंतूनाशकांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचादेखील वापर केला जाणार आहे. तर एरियल स्प्रे द्वारा पिकांवर जंतूनाशकं फवारण्यासाठी खास हेलिकॉप्टर्सची व्यवस्था केली जाणार आहे.
पाकिस्तानमधून काही दिवसांपूर्वी भारतात राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशामध्ये टोळीधाडींचा प्रवेश झाल्याने कापसासह शेतामध्ये असलेल्या अन्न धान्यांच्या, फळभाज्यांच्या पीकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.