प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

देशात जवळ जवळ तीन महिन्यानंतर कोरोना व्हायरस लॉक डाऊन (Coronavirus Lockdown) मध्ये शिथिलता देण्यात आली. त्यानंतर आता अनलॉक 2 (Unlock 2) चे नियमही जाहीर करण्यात आले. मात्र देशातील कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन असेल असे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले. त्यानंतर ठाण्यातही (Thane) कडक लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने (TMC) एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये या लॉक डाऊनमध्ये काय सुरु असेल व काय  बंद असेल याबाबत माहिती देण्यात आली आहे.

टीएमसीने सांगितले आहे, ‘आयुक्त ठाणे महानगरपालिका यांची खात्री झाली आहे की, कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी ठाणे शहरामध्ये लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यापासून बचाव करष्यासाठी पुढील काही आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअर्थी, साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या सर्व संबंधित तरतुरदींसहप्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करुन, ठाणे महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका हद्दीत दि.02/07/2020 रोजी सकाळी 7 ते दि.12/07/2020 सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. सर्व हॉटस्पॉटमध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे.

टीएमसी ट्वीट-

या कालावधीत खालील नियम व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल.

1) अत्यावश्यक अ्रणि नाशवंत वस्तूच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरिता ठाणे महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

2) इंटरसिटी, एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी दिली जाणार नाही. टॅक्सी, ऑटोरिक्षा, यांना परवानगी नाही. मात्र, आपत्कालिन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी/देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल.

या ऑर्डर अंतर्गत ड्रायव्हर शिवाय केवळ एका प्रवाशासह जीवनावश्यक वस्तु, आरोग्य सेवा आणि या ऑर्डर अंतर्गत मान्य कृतींकरिता परवानगी असेल.

3) सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतुक सेवांचे (खाजगी वाहनांसह), तसेच खाजगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद असेल. मात्र बाहेरुन येऊन, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल.

4) ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्यांनी त्याचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि तिला/त्याला महानगरपालिकेच्या क्वॉरंटाईन सेंटर मध्ये स्थलांतरित केले जाईल.

5) सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतील.

6) सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल.

7) व्यावसायिक आस्थापना कार्यालये आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील. मात्र सतत प्रक्रिया अणि फार्मास्युटिकल्स, इत्यादीं आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिट्सना परवानगी असेल. डाळ व तांदुळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या, आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स चालविण्यास परवानगी असेल.

8) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह ऑपरेट करण्याची परवानगी असेल आणि ते चेक काऊंटरजवळ, एकमेकांपासुन 3 फुट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी पावले उचलतील. ते त्यांच्या आवारात योग्य स्वच्छता आणि हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करतील. (हेही वाचा: अनलॉक-2 साठी मार्गदर्शक सूचना जाहीर; शाळा-महाविद्यालये, मेट्रो सह धार्मिक समारंभ 31 जुलैपर्यंत बंद; जाणून घ्या काय बंद व काय सुरु)

प्रतिबंधामधून वगळलेल्या गोष्टी –

  • बँका/एटीएम्स/विमा आणि संबंधित बाबी
  • प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे
  • आय.टी. आणि आयटीईएस, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवा
  • पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व उपलब्धता
  • कृषी वस्तु आणि उत्पादने आणि सर्व वस्तूंची निर्यात अणि आयात
  • अन्न, फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तूंचे ई कॉमर्स (वितरण)
  • पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापने.
  • रुग्णालये, फार्मेसि आणि ऑप्टिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरिंग्ज आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक.
  • पेट्रोल पंप, एलपीजी, गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे आणि त्यांची संबंधित वाहतूक कार्ये.
  • केवळ अत्यावश्यक सेवेतील पास धारक ई.

अशाप्रकारे गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यातील लॉक डाऊनबाबत चालू असलेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. आता पालिकेनेच अध्यादेश काढून याबाबत माहिती दिली आहे.