Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सुमारे 1000 कोटी रुपयांची मालमत्ता (Market Value Of Ajit Pawar's Property) आयकर विभागाने जप्त केली आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईत एकूण पाच ठिकाणच्या मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक केल्यानंतर राज्य सरकारला काही तासांतच मिळालेल्या दुसरा झटका आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या संस्थांनी महाराष्ट्रातील आणि त्यातही प्रामुख्याने महाविकासआघाडी सरकारच्या नेत्यांवर जोरदार कारवाई सुरु केली असल्याचे चित्र आहे. अनिल देशमुख यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई येथील कार्यालयात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. देशमुख यांच्यावरील कारवाईनंतर अल्पावधीतच अजित पवार यांच्या संपत्तीवर कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली संपत्ती

  • जरंडेश्वर साखर कारखाना- (बाजारातील कथीत किंमत 600 कोटी रुपये)
  • साउथ दिल्ली येथील फ्लॅट- (बाजारातील कथीत किंमत 20 कोटी रुपये)
  • पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट येथील निर्मल ऑफिस- (बाजारातील कथीत किंमत 25 कोटी रुपये)
  • गोवा येथील निलय रिसॉर्ट- (बाजारातील कथीत किंमत 250 कोटी रुपये)
  • महाराष्ट्रातील इतर विविध 27 ठिकाणची जमीन (बाजारातील कथीत किंमत 500 कोटी रुपये)

अजित पवार यांची संपत्ती जप्त करण्यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या घर, कार्यालय आणि व्यवसायांच्या ठिकाणीही छापेमारी केली होती. यात अजित पवार यांच्या बहिणी, मामांची मुले आणि स्वत: पूत्र पार्थ पवार यांच्या मालमत्तांचाही समावेश होता. ज्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. (हेही वाचा, Anil Deshmukh Arrested: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मध्यरात्री ED कडून अटक)

ट्विट

महाविकासाघाडीतील अनेक नेते या वर्षाच्या सुरुवातीपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर राहिले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस चर्चेत आले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपामुळे अनिल देशमुख केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले. त्यांनतर आरोप करणारे परमबीर सिंह स्वत:च गायब झाले आहेत. आणि इडीने अनेक समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांना ईडीने अटक केली. 71 वर्षीय अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.