Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लाडकी बहीण योजणा (Ladki Bahin Yojana), राज्य सरकारसाठी डोक्याला ताप ठरु लागली आहे. या योजनेवरुन सातत्याने या ना त्या कारणाने चर्चा होत राहतात. जनतेमध्ये संभ्रम तयार होतो आणि मग स्वत: सरकारलाच यावरुन स्पष्टीकरण देत बसण्याची वेळ येते. राज्यातील मंत्र्यांकडून योजनेबाबत केली जाणारी उलटसुलट वक्तव्ये कमी होती की, काय म्हणून आता पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी थेट घुमजाव करणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही' आता या वक्तव्यामुळे झिरवाळ आणि सरकार पुन्हा चर्चेत आले आहेत.

सरकारकडूनच संभ्रम

नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली असतानाच, भूतकाळातील घटनांचा संदर्भ पुन्हा एकदा तपासला जातो आहे. वास्तविक पाहता विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार सुरु असताना लाडकी बहीण योजना भविष्यात बंद केली जाईल, असा दावा केला जात होता. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून या दाव्यांचे खंडण करताना ही योजना बंद तर होणारच नाही, पण उलट त्यात आणखी 600 रुपयांची वाढ करून एकूण रक्कम 2100 रुपये इतकी केली जाईल, असे सांगितले जात होते. इतकेच नव्हे तर राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावरही, सत्ताधारी पक्षाने सांगितले होते. यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील होते. दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी 2100 रुपये कधी द्यायचे ते आर्थिक बजेट पाहून निर्णय घेऊ असे वक्तव्य केले. असे असताना नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्याने सगळेच अवाक झाले आहे. (हेही वाचा, Narhari Zirwal Take Oath as Cabinet Minister: बिगारीचे कामगार, नंतर आमदार आणि आता थेट मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नरहरी झिरवाळांची वर्णी)

एप्रिल महिन्यातील हप्ता केव्हा?

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातील हप्ता केव्हा मिळणार याबाबतत लाभार्थी महिलांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. सांगितले जात आहे की, अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर लाभार्थींच्या खात्यावर या योजनेतील विद्यमान हप्ता 1500 रुपये जमा केला जाईल. सध्यास्थितीमध्ये राज्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये इतकी मदत दिली जाते. त्यात वाढ करुन तो 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन सरकारने अनेकदा दिले आहे. पण त्यावरुन पुन्हा घुमजावही केले आहे. त्यामुळे सरकारची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे निमंत्रण, जेवणार तेव्हाच खरे मानणार अशी स्थिती आहे. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेच्या निकष आणि पात्रतेवर अधिक भर दिल्याने अनेक लाभार्थ्यांची नावे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून घसरल्याचेही पाहायला मिळत आहे.