Narhari Zirwal Take Oath as Cabinet Minister: राज्यातील विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र सरकारचे नवे मंत्री नागपुरातील राजभवनात शपथ घेत आहेत. 1991 नंतर दुसऱ्यांदा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवीन मंत्र्यांना राजभवनात शपथ देत आहेत. महायुती सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. याशिवाय, शिवसेनेकडून 3 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस नेते नरहरी झिरवाळ ( Narhari Zirwal) यांना महायुतीच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.
दरम्यान, दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. बिगारी कामगार, नंतर आमदार. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष आणि आता मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ यांचा जन्म 1 जून 1959 झाला. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे नरहरी झिरवाळ यांचे गाव. झिरवाळ यांनी 12 वी नंतर कला शाखेत शिक्षण घेतले. सुरुवातीला नरहरी झिरवाळ यांनी बांधकामामध्ये बिगारीचे काम त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी लिपिक म्हणून काम केले. परंतु, त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यानंतर त्यांनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. (हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion: नागपूरमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार सोहळा सुरू; पहा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संपूर्ण यादी)
दरम्यान, सामाजिक उपक्रमानंतर त्यांनी गावच्या राजकारणात भाग घेतला आणि ते गावचे सरपंच झाले. त्यानंतर ते पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रीय काँग्रेसमधून उपसभापती झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2001 साली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. पुढीला काळात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 2004, 2014 व 2019, 2024 च्या निवडणुकांमध्ये झिरवाळ चार वेळा आमदार म्हणून निवडणून आले. (हेही वाचा -Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ)
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी झाले. झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुनिता चारोस्कर यांचा पराभव केला. दिंडोरी मतदारसंघ हा अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठी राखीव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या गटात सामील झाले होते.