Ladki Bahin Yojana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात चांगलीच लोकप्रिय ठरल्याचे मानले जात आहे. पण, वास्तविक पाहता ही योजना राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार टाकणारी आणि इतर विभागांच्या उपक्रमांना हादरा देणारी ठरत आहे. या एका योजनेमुळे इतर योजनांना फटका बसल्याची आगोदरच चर्चा होती. आता तर थेट आरोपच होऊ लागले आहेत. शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर ही योजना राज्यातील ज्येष्ठ कलारासांसाठी अडचणीची ठरत असल्याचे म्हटले आहे. ही योजना फसवी असून, त्याचा इतर योजनांच्या लाभार्थ्यांना त्रास होतो आहे. अलिकडेच मला काही ज्येष्ठ कलाकार येऊन भेटले होते. ही योजना सुरु झाल्यापासून त्यांना कलाकारांसाठी असलेल्या योजनेचे पैसे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.

वृद्ध कलाकार रोज रडतात

लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्य सरकारने इतर योजनांवर होणाऱ्या खर्चावरील हात आकडता घेतला आहे. राज्याची एकूण आर्थिक स्थिती पाहता सरकारला ही योजना राबविणे जिकीरीचे होत आहे. पण तरी देखील राज्य सरकार ही योजना रेटत असल्याचे अभ्यासक सांगतात. विरोधी पक्ष आरोप करतात की, राज्य सरकारने कोणताही अभ्यास न करता ही योजना सुरु केली. त्यामुळे त्याचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. परिणामी इतर विभागांना त्यांच्या हिश्श्याचे पैसे खर्च करता येत नाही. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना आजवर किती पैसे मिळाले? सरकारने विधिमंडळात दिली माहिती)

लाडकी बहीण योजना फसवी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ही योजना अतिशय फसवी आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने योजना सुरु केली. आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर या योजनेची रक्कम प्रति महिना 2100 रुपये करु असे आश्वासन या मंडळींनी दिले. पण आता प्रत्यक्षात महिलांना प्रति महिना 1500 रुपये देतानाच यांच्या नाकी नऊ आले आहेत. आत पुन्हा जरी ते सत्तेत आले तरी त्यांनी 2100 रुपयांबाबत चकार एक शब्द काढला नाही. त्यावरुनच लक्षात येते की, ही योजना फसवी आहे. सरकारचे लोक दररोज नवे काही सांगून लोकांना फसवत आहेत.

अलिकडेच मला काही वृद्ध कलाकार भेटण्यास आले होते. त्यांना प्रत्येक महिन्याकाटी काही रक्कम सरकारकडून मानधन स्वरुपात मिळते. पण, लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून हे मानधन त्यांना वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे हे कलाकार अस्वस्थ आहेत. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडले जात असून, राज्याची आर्थिक स्थितीही गंभीर आहे, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी संवाद सादत होते.