
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना आतापर्यंत किती रक्कम मिळाली, याबाबत राज्यातील नागरिकांना उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर स्वत: राज्य सरकारनेच दिले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी (7 मार्च) मांडला. या अहवालात त्यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत जून 2024 ते डिसेंबर 2024 या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये आजवर तब्बल 17 हजार 505 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ज्याचा राज्यातील 2 कोटी 38 लाख महिलांना लाभ झाला.
लाभार्थी महिलांना प्रत्येकी 10,500 रुपयांचा लाभ
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात अजित पवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रति महिना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात आले. त्यामुळे या योनच्या पहिल्या हप्त्यापासून प्रत्येक महिन्यात लाभ घेणाऱ्या महिलेस आतापर्यंत प्रत्येकी 10,500 इतका लाभ झाला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये प्रचार करताना आणि नंतर सत्तेवर आल्यावरही या योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून 1500 रुपयांऐवजी ती 2100 करणार असे आश्वसन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पा केली जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.
लाडकी लेक योजना लभातही वाढ
केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे तर राज्य सरकारने लेक लाडकी योजना देखील सुरु केली आहे. या योजनेत सन 2023-24 या आर्थिक वर्षात असलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 हजार 889 इतकी होती. या लाभार्थ्यांना एकूण 7 कोटी 79 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मात्र त्यात मोठी वाढ झाली असून, लाभार्थ्यांची संख्या हजरांमध्यून लाखांमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेत आता राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, एक लाख चार हजार इतके लाभार्थी आहेत. या सर्वांना मिळून एकत्रितपणे 52 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. यासोबतच कन्या भाग्यश्री योजनेत देखील लाभार्थ्यांची संख्या वाढल्याचे पाहायल मिळाले. सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2023-24 कन्या भाग्यश्री योजना लाभार्थ्यांना सहा कोटी 78 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. त्यात वाढ होऊ तोच आकडा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 13 कोटी 2० लाखांवर पोहोचला आहे.
दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील लाभाचे पैसे एकत्रच दिले जाणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी आगोदरच दिली आहे. त्यामुळे आठ मार्च किंवा त्याच्या पूर्वसंध्येस म्हणजे आजच प्रतिमहिना 1500 रुपये याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये येणे अपेक्षीत आहे. ते केव्हा येणार याबाबत उत्सुकता आहे.