
महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल विचारल्यावर येणारे उत्तर 'ऐकावे ते नवलच', असे असू शकते. कुठे खून, मारामारी, बलात्कार तर कधी कोयता गँग असे प्रकार राजरोस सुरु असतानाच आता डिजिटल अटक, सायबर घोटाळा, सायबर फसवणूक, शेअर मार्केट फ्रॉड आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यासोबतच आता लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुद्धा फसवणुकीची शिकार झाली आहे. योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 65 महिलांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. या महिलांच्या नावे परस्परच 20 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई यथील मानखुर्दमध्ये (Mankhurd) परिसरात ही घटना घडली आहे. राज्यातील इतर ठिकाणीही अशा घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसूलीसाठी प्रतिनिधी आल्यावर फसवणूक झाल्याचे उघड
धक्कादायक असे की, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या नावावर आरोपीने लाखो रुपयांचे 20 आयफोन खरेदी केले. आपल्या नावावर कर्ज काढून अशी कोणती खरेदी झाल्याची तसूभरही कल्पना या महिलांना नव्हती. अखेर ज्या वित्तसंस्थेकडून हे कर्ज घेण्यात आले होते. त्या संस्थेच्या प्रतिनिधींनी या महिलांची भेट घेतली. कर्ज घेतलेल्या काही महिला पाठिमागील काही महिन्यांपासून कोणत्याच रकमेचा हप्ता भरत नाहीत. त्यामुळे उत्सुकता आणि कामाचा भाग म्हणून या प्रतिनिधींनी सदर महिलांची भेट घेतली. तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: तिजोरीवर भार! लाडकी बहीण योजना बंद होणार? अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं; काय म्हणाले उपमुख्यमंत्री? घ्या जाणून)
महिलांच्या नावे आयफोन खरेदी
लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे पुढे येताच परिसरात खळबळ उडाली. या संपूर्ण प्रकरणांमध्ये चार ते पाच व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर (2024) मध्ये काही लोकांनी मानखूर्द परिसरातील महिलांना गाठत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांची आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड, पासबुक यांसह कागदपत्रे, छायाचित्रे घेतली. त्यानंतर विस्तसंस्थेतील दोन कर्मचाऱ्यांहाताशी धरुन या महिलांना कुर्ला आणि अंधेरी येथील आयफोन गॅलरीत नेण्यात आले. इथे या महिलांच्या नावे काही आयफोन खरेदी करण्यात आले. हे आयफोन त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आणि त्यांच्या बँक खात्यावर केवळ दोन ते अडीच हजार पाठविण्यात आले. हा या योजनेचा पहिला हप्ता असल्याचेही त्यांनासांगण्यात आले. याच वेळी त्यांच्याकडून काही काळासाठी त्यांचे स्वत:चे मोबाईलही काढून घेण्यात आले. नंतर सर्व प्रक्रिया करुन त्यांच्या नावे आयफोन कर्जावू घेण्यात आले. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी आणि तपास होण्याची शक्यता आहे.