CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

लोकांची मदत करणे, लोकांना संकटातून बाहेर काढणे यासाठी काम करण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतो. आम्ही जे बोलतो ते करतो. मी मदत पॅकेज वाटणारा नव्हे तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे पॅकेजबाबत कोण काय बोलते याकडे मी लक्ष देत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आलेल्या महापूरामुळे ( Kolhapur Floods) झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. काही गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला. या सर्व कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आयोजित पत्रकार परिषदेत (CM Uddhav Thackeray Kolhapur Press Conference) बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे खासदार आणि इतर नेते उपस्थित होते.

नागरिकांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य

मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी या वेळी सांगितले की, ''महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.'' (हेही वाचा, Kolhapur Floods: असं किती काळ चालणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर दौऱ्यात नृसिंहवाडी गावातील ग्रामस्थांना अवाहन)

 कठोर निर्णयांची आवश्यकता

मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, ''नद्या फुगल्यामुळे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा करून काम सुरू केलं जाणार आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबतीत काही उपाययोजना केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.'' कोठोर निर्णय घेतानाही आपण पाठीशी राहा असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

एनडीआरएफचे निकष बदलायला हवे

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागे आम्ही पंतप्रधानांशी बोलताना सांगितले की, एनडीआरएफचे निकशही आता बदलायला हवेत. हे निकष 2015 चे आहेत. आता 2021 सुरु आहे. त्यामळे या काळात संकटांचे स्वरुपही बदलले आहे. त्यामुळे हे निकष बदलून त्यानुसार मदत करायला हवी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय विमा कंपन्यांनीही त्यांच्या निकशात बदल करायला हवेत. सरकारने केलेला पंचनामा स्वीकारायला हवा. सरकार ही लोककल्याणकारी संस्था आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी त्यांचे वेगळे निकष लावण्याची (काही घटनांमध्ये) गरज नाही. काही ठिकाणी नुकसान झाल्यानंतर लगेचच साफसफाई मोहीम राबवली जाते. कारण रोगराईचा धोका असतो म्हणून. अशा वेळी विमा कंपन्यांना पंचनामा करताना फारसे काही आढळत नाही, त्यामळे हे निकष बदलणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.