कंगना रनौतला (Kangana Ranaut) मुंबई (Mumbai) बद्दल केलेले वक्यव्य चांगलेच भोवणार असे दिसत आहे. कंगनाने मुंबईचा उल्लेख ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ (POK) असा केल्याने महाराष्ट्रामध्ये तिच्यावर कडाडून टीका होत आहे. आता कंगनाने ती 9 सप्टेंबरला मुंबईमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर मनसेचे (MNS) अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी, ‘एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न’, असा टोला लगावला आहे. ‘येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तव्हा मी नक्कीच वेळ पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा'’ असे ट्वीट कंगनाने केले आहे, त्यावर मनसे आक्रमक झाली आहे.
कंगनाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेय खोपकर म्हणाले, ‘कंगनाचे एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सुक आहेत असे कुणाला वाटत असेलही, पण कुणाला किती महत्त्व द्यायचे, हे राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेले आहे. दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही एक विकृतीच आहे आणि या विकृतीमागे कुणाचे डोके आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे. एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचे असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे. म्हणूनच आमच्या दोन मागण्या आहेत’
पुढे खोपकर यांनी आपल्या मागण्या सांगितल्या आहेत - 1. कंगनावर त्वरित मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरु करण्यात यावेत. 2. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. (हेही वाचा: '9 सप्टेंबरला येत आहे मुंबईत, कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर अडवून दाखवा'-अभिनेत्री कंगना रनौत)
अमेय खोपकर ट्वीट -
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020
दरम्यान, याआधी कंगनाने 'मूव्ही माफिया' पेक्षा मुंबई शहरातील पोलिसांची जास्त भीती वाटत आहे, असे ट्वीट केले होते. त्यावर संजय राऊत यांनी तू मुंबईमध्ये येऊ नकोस असा सल्ला दिला. याच गोष्टीमुळे कंगनाने ‘मुंबई ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’सारखी भासत आहे’, असे ट्वीट केले. त्यानंतर कंगनावर टीकांचा भडीमार व्हायला सुरुवात झाली. आता कंगनाने ती 9 सप्टेंबरला मुंबईमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे, त्यावर मनसेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.