कल्याण-डोंबिवलीकरांनो सावधान! लवकरच कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) परिसरातील पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास शहरातील पाणीपट्टीत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे असे प्रशासनाकडून संकेत मिळत आहे. दुपटीने वाढ म्हणजे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. यामुळे या दरवाढीला नागरिकांसह राजकीय विरोध होण्याची देखील शक्यता आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोजदाद करणारी यंत्रणा नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी बारावे, नेतिवली, मोहिली येथे पाणी शुद्धीकरण करण्याची स्वतंत्र यंत्रणा आहे. ग्रामीण भागाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. मात्र नागरिकांना पिण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची मोजदाद करण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. तर दुसरीकडे पाणी उचलण्याचा खर्च, वीज देयके, पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी रसायने, आस्थापना, देखभाल-दुरुस्ती, घसारा, कर्जाची परतफेड, प्रदूषण मंडळाकडून आकारला जाणारा पाणी अधिभार, पाणी नमुना तपासणी यांसाठीचा खर्च वाढत असतानाच पिण्याच्या पाण्याची मागणीही उंचावत आहे. पाणी पुरवठा विभाग तोट्यात असल्याचे कारण देत प्रशासनाकडून पाणी दरात तब्बल दुपटीने वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- Bharat Bandh: मुंबई मध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कांजूर मार्ग स्थानकामध्ये 'बहुजन क्रांती मोर्चा' कडून रेल रोको
ही दरवाढ स्थायी समितीने मान्य केल्यास नागरिकांच्या खिशावर भार पडणार आहे. दुसरीकडे पाणी गळतीचा प्रश्न अद्याप कायम आहे. पाणीचोरीला आळा घालण्यातही अद्याप यश आलेले नाही.
यंदा होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित पाणीपट्टी वाढीला स्थायी समितीकडून परवानगी मिळणे अवघड असले तरी प्रशासनाकडून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे.