Jeff Bezos च्या Blue Origin टीम मध्ये मराठमोळ्या Sanjal Gavande चा समावेश; Space Rocket बनवणार्‍या टीमचा भाग
New Shepard Rocket (Photo Credits: Twitter)

अमेझॉन चे संस्थापक आणि ब्लू ओरिजिनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos) येत्या 20 जुलै दिवशी अमेरिकेतून ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने अंतराळ सफारीला जाणार आहे. न्यु शेफर्ड हे खासगी यान त्यासाठी वापरले जाणार आहे. पण मराठी लोकांसाठी या घटनेमधील अभिमानाची बाब म्हणजे हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणच्या संजल गावंडे (Sanjal Gavande) हिचा समावेश आहे. आहे. संजल ही मराठमोळी 30 वर्षीय इंजिनियर असून काही वर्षांपूर्वी ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली आणि त्यामधून तिला ही संधी मिळाली आहे.

संजल गावंडे हीने मुंबई विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. अमेरिकेतील मिशगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये मास्टर्स केले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत मॅकॅनिकलमध्ये मास्टर्सची डिग्री मिळवली. यानंतर 2013 मध्ये तिने विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन कंपनीत जॉब करण्यास सुरूवात केली. अवकाश खुणावणार्‍या संजलने पुढे कॅलिफॉर्निया मधील Toyota Racing Development मध्ये काम करण्यास सुरूवात केली. न्यु शेफर्ड हे सध्या स्पेस टुरिझम मधील माईलस्टोन मानलं जात आहे.

संजलची आई एमटीएनएलमध्ये काम करतात तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत. टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना संजलच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये संजलला लहानपणापासूनच अवकाशात जाण्याचे वेड होतं असं सांग़ितलं आहे.तिचा गाड्यांपासून अवकाशयान पर्यंतचा प्रवास अभिमानास्पद असल्याचं त्या सांगतात.

दरम्यान टीम ओरिजनचा एक भाग असल्याचा मला देखील अभिमान असल्याचं सांगत संजलने आपला आनंद टीओआय सोबत बोलताना व्यक्त केला आहे. 2016 साली संजलला पायलट लायसंस देखील मिळालं आहे. टोयाटो मध्ये काम करताना ती विकेंड्सला फ्लाईंग शिकत होती.

संजलने नासा मध्येही नोकरीचा अर्ज केला होता पण तेथे तिची निवड झाली नाही. नंतर ब्लू ओरिजिन मध्ये सिस्टिम इंजिनियर म्हणून ती रूजू झाली त्यानंतर रॉकेट बनवणार्‍या टीमचा ती एक भाग बनली. सर्वसामान्य घरात जन्मलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकलेल्या मुलीची ही आंतरराष्ट्रीय प्रकल्पापर्यंतची भरारी तिच्या कुटुंबा साठी अभिमानास्पद असल्याची भावना संजलच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.