
जळगाव (Jalgaon) जिल्हा भाजप कार्यालयात आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक उद्या (3 जानेवारी 2020) पार पडत आहे. या निवडणुकीनिमित्ताने भाजप (BJP) कोअर कमेटीची बैठक कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन एकत्र आलेले पाहायला मिळाले. एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोप प्रत्यारोपानंतर हे दोन्ही नेते प्रथमच एकत्र आले होते. तसेच, कोअर कमेटीच्या बैठकीत हे दोन्ही नेते शेजारीशेजारी बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या दोघांनी माझे राजकारण संपविण्यासाठीच विधानसभा निवडणुकीत माझे तिकीट कापले. या दोघांनी आपले राजकारण सरळ करण्यासाठी माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ आणि भाजप हा पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केलेले महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे खडसे यांच्या आरोपामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली. सहाजीकच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे खडसे यांच्या आरोपावर काय प्रतिक्रिया देतात याकडे प्रसारमाध्यमांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.
एकनाथ खडसे यांनी हवेत गोळ्या मारु नये. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे खडसेचे तिकीट कापण्यासाठी कारणीभूत असल्याचे दिल्लीतील कोणत्या नेत्यांने त्यांना सांगितले हे स्पष्ट करावे. कोणीतरी खडसे यांची दिशाभूल करत असावे. त्यामुळेच त्यांनी असे आरोप केले असावेत. कोणताही आधार नसताना आमचे नाव घेणे हे आमच्यावर अन्याय करणारे आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर व्यक्त केली होती. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यामुळे माझं तिकीट कापलं, माझं राजकारण संपवण्याचा डाव; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट)
इतके सगळे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन या वादावर काय तोडगा निघतो याकडे भाजप कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे दोन्ही नेते आज जळगाव जिल्हा भाजप कार्यालयात कोअर कमेटी बैठकी निमित्त एकत्र आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.