Eknath Shinde | (Photo Credits: X)

Maharashtra CM Oath Taking Ceremony: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज (4 डिसेंबर) सायंकाळी 5.30 वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडत आहे. या सोहळ्यात महायुती (Mahayuti Alliance) सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. मात्र, महायुतीचा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शपथ घेणार की नाही याबाबत उत्सुकता कायम आहे. उपमुख्यमंत्री पद आणि सत्तावाटपात वाट्याला येणारी मंत्रीपदे यांवरुन महायुतीमध्ये मानापमानाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष शपथविधीसाठी अवघे काही तासच बाकी असताना हे नाट्य घडल्याने सत्ताधारी वर्गातील अस्वस्थता वाढत आहे. शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले असून, भाजप नेते गिरीश महाजन त्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

शिंदे उपमुख्यमंत्री पदावर राजी?

भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची निमंत्रणपत्रिकाही छापली आहे. पण, त्यात एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. परिणामी शिंदे आणि त्यांची शिवसेना शपथविधी सोहळ्यात शपथ आणि सहभाग घेणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. त्यांची मनधरणी केली. त्यानंतरच शिंदे हे सोहळ्यात सहभागी होण्यास तयार झाल्याचे समजते. दरम्यान, सर्व आमदारांना शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सूचना गेल्या असल्याचेही वृत्त आहे. (हेही वाचा, Maharashtra CM Oath Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबई येथील आझाद मैदानावर सोहळा)

शिवसेनेचा डोळा गृहमंत्री पदावर

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहिले आहेत. अशा वेळी आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत असताना त्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी पक्षासाठी वेळ मिळावा म्हणून मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याचा विचार केला होता. मात्र, मित्रपक्ष आणि स्वपक्षाचे आमदार यांच्याकडून वाढत्या दबावापोटी शिंदे यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यावाचून पर्याय राहिला नाही. अशाही स्थितीमध्ये किमान आपल्या पक्षाला चांगली खाती मिळावी यासाठी शिंदे प्रयत्नशिल आहेत. आपल्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळावे ही, त्यांची मागणी आहे. पण, त्यांच्या या मागणीला भाजपने दाद दिली नाही. त्यामुळेही त्यांची नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे. पाठिमागच्या काही काळापासून त्यांची प्रकृती अचानक बिघडली, मध्येच ते त्यांच्या सातारा येथील मूळ दरे गावी देखील जाणून आले. मध्येच ते सर्व प्रक्रियेपासून अलीप्तही राहिले. त्यामुळे शिंदे यांच्या मनात नेमके काय? उलटसुलट चर्चा आहेत. (हेही वाचा, Maharashtra CM, Dy CM Swearing-in Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला PM Narendra Modi ते लाडकी बहीण योजना लाभार्थी पहा कोणा कोणाला आमंत्रण?)

शपथविधीस मान्यवरांची उपस्थिती

दरम्यान, आझाद मैदानावर पार पडत असलेल्या देदिप्यमान शपथविधी सोहळ्यास देशाचे पंतप्रधान आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशा वेळी अशा सोहळ्यात आपली उपस्थिती नसेल आणि नंतर आपण राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यावर छोटेखणी शपथविधी पार पडत असेल, तर त्याचा उपयोग काय? असाही सूर आमदारांमधून उमटल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला, आमच्या नेत्याचा योग्य सन्मान राखला जात नसेल तर आम्हीही कोणी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शपथविधीचा अंतिम क्षण आला तरीसुद्धा हा पेच का आहे? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.