महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. दक्षिण मुंबई मध्ये संध्याकाळी 5.30 वाजता महायुतीच्या शपथविधी सोहळा सुरू होत आहे. या दृष्टीने मुंबई मध्ये तयारीला सुरूवात झाली आहे. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. शपथविधीच्या स्थळी वाहतूकीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. आज राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथबद्ध होतील. या सोहळ्याला अनेक मान्यावरांसोबत सामान्य जनतेला देखील उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची आमंत्रण पत्रिका सोशल मीडीयामध्ये वायरल; Devendra Fadnavis यांच्या नावात पहिल्यांदाच आईच्या नावाचा उल्लेख .
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला कोण राहणार उपस्थित?
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात आज केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. हा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. दिल्लीवरून खास या सोहळ्यासाठी ते आज मुंबईत दाखल होतील. सोबतच शिवसेना, भाजपा आणि एनसीपी यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शपथविधीसाठी मुंबईत आले आहेत. महायुतीच्या यशात 'मुख्यमंत्री माझी लाडकी योजना' ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिला देखील हजर राहणार आहेत. Ajit Pawar आज सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; 4 मुख्यमंत्र्यांसोबत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे ठरले एकमेव नेते!
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज सोहळ्याला उपस्थित असतील. सोबतच एनडीए चे सरकार असलेले मुख्यमंत्री मुंबई मध्ये येणार आहेत. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांची उपस्थिती असू शकते.
दरम्यान महायुती कडून राज्यातील माजी मुख्यमंत्री, विरोधक उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनाही आमंत्रण केले आहे. परंतू त्यांच्याकडून उपस्थितीची शक्यता कमी आहे. आज उबाठा गटाकडून संजय राऊत यांनी परंपरेप्रमाणे आमच्या सरकारला शुभेच्छा असतील असं म्हटलं आहे.
आजच्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही संत महंत, उद्योजक, बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची उपस्थिती असू शकते. सुमारे 42,000 उपस्थितांच्या हजेरीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होण्याचा अंदाज आहे.