India Meteorological Departmen: राज्यात यंदाचा मान्सून अपवाद वगळता कोरडाच गेला. ऐन पावसाळ्यात वरुनराजाने दांडी मारली. त्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती पाहायला मिळू लागली आहे. एका बाजूला पावसाने मारलेली दडी दुसऱ्या बाजूला थंडीही गायब झाली आहे. ऑक्टोबर हीट आणि दिवाळीच्या काळात हुडहुडी भरवणारी थंडी हे जवळपास समिकरणच आहे. यंदा दिवाली काहीशी उशीरा आली. असे असले तरी दिवाळी तोंडावर येऊनही राज्यात थंडी मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे यंदा हुडहुडी भरणार की नाही? की पावसाप्रमाणे थंडीही तळपत्या भास्करापुढे अज्ञात ठिकाणी गुडूप होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD News) याबाबत अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाचा हवाला देत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचा कडाका काहीसा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याउलट राज्यातील काही भागात रिमझीम पाऊस पाहायला मिळेल. अरबी समुद्र आणि प्रामुख्याने केरळच्या समुद्रकिनारपट्टीलगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आणि देशातीलही अनेक ठिकाणी तापमान वाढ पाहाला मिळू शकते.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील तापमानात कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीनंतर पहाटे आणि सकाळच्या प्रहरी हवेत गारठा पाहायला मिळतो आह. मात्र, सूर्वदेवाचे आगमन होताच ही थंडी सकाळीच गायब होते आहे आणि दुपारी कडाक्याचे उन पाहायला मिळत आहे. खास करुन मुंबई, कोकण आणि राज्यातील इतर ठिकाणी वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात तापमानाचा पारा खाली जाण्याची शक्यता आहे. अर्थात तो अद्याप पर्यंत तरी म्हणावा तसा खाली गेला नाही. मात्र, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली यांसारख्या काही भागांमध्ये हलकीशी थंडी सकाळी पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाने नोव्हेंबर 2023 महिन्यासाठी हवामानाचा अंदाज मंगळवारी व्यक्त केला. आयएमडीने म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. पण, असे असले तरी थंडी मात्र कमीच राहील. याचाच अर्थ पारा मर्यादित स्वरुपातच खाली जाईल. देशाचे तपामान यंदा सरासरीच्या वर जाऊ शकते. परिणामी महाराष्ट्रातही तापमान चढेच राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.