'जर गेलेले आमदार अजूनही शिवसेनेत असतील तर महाविकास आघाडी बहुमतात आहे'- Minister Ajit Pawar
Ajit Pawar | (File Photo)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेविरुद्ध (Shiv Sena) बंड केल्याने राज्यावर मोठे राजकीय संकट आले आहे. या दरम्यान सत्ताधारी महाविकास आघाडी आपले सरकार वाचवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत आहे. नुकतेच उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सद्य स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांचा गट अजूनही आपण शिवसेनेत असल्याचे सांगत असेल, तर महाविकास आघाडी अजूनही बहुमतात आहे. त्यामुळे शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस अजूनही एकत्र आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते आज संध्याकाळी 6.30 वाजता मातोश्री (ठाकरे निवासस्थान) येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आमची भूमिका कालचीच आहे. आम्ही सरकार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू. आज संध्याकाळच्या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल.’

गेल्या दोन दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयाबाबत अजित पवार म्हणाले, ‘सध्या आम्ही सत्तेत आहोत आणि आम्हाला बहुमत आहे. जसे एक सरकार निर्णय घेते तसे निर्णय आम्ही घेत आहोत. तुम्ही सत्तेत असता आणि तुम्हाला बहुमत असेल तर तुम्हीही असेच केले नसते का? असे निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. संबंधित मंत्री आणि अधिकारी मिळून निर्णय घेत आहेत.’

याबाबत भाजपचे एमएलसी प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ज्या प्रकारे योजना, प्रकल्प आणि कंत्राटे देण्याबाबत एकापाठोपाठ एक संशयास्पद निर्णय घेत आहे, त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: गुवाहाटी येथील आमदारांनी एकनाथ शिंदेंना दिले निर्णय घेण्याचे सर्वाधिकार; बैठकीत 'राष्ट्रीय पक्षा'चा पाठींबा असल्याचा उल्लेख (Watch)

दरम्यान, महाराष्ट्रात झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा, आपल्याला मुख्यमंत्री पदाचा लोभ नसल्याचे सांगितले आहे. मात्र या पदावर कायम राहण्याची जिद्द आपण सोडली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी भाष्य केले. आज दुपारी एक वाजता सेना भवन येथे जिल्हाप्रमुख व तहसील प्रमुखांची बैठक झाली. ज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संबोधित केले.