एकनाथ शिंदे (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात सुरु झालेला राजकीय संघर्ष क्षणोक्षणी वाढत चालला आहे. विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार बंड करून सुरत येथे गेले. त्यानंतर आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह या बंडखोर आमदारांनी आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आमदारांच्या या बंडामुळे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. अशात गुवाहाटीवरून एकनाथ शिंदे यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये गुवाहाटी येथील शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे केले सुपूर्द केलेले दिसत आहे. सर्वांनी एकमताने गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता आपल्याला भाजपचा पाठींबा असल्याचे मान्य केले आहे.

यावेळी ते आमदारांना उद्देशून म्हणतात, 'आता जे काही सुख-दुःख आहे ते आपल्या सर्वांचे आहे. काहीही झाले तरी आपण एकजुटीने राहू, विजय आपलाच आहे. तो एक राष्ट्रीय पक्ष आहे. एक महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो एक ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्या मागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काहीही लागले तरी कमी पडणार नाही व याची प्रचीती जेव्हा जेव्हा आपल्याला काही लागेल तेव्हा येईल.’ (हेही वाचा: 'एक दिवस तुम्हालाही जावे लागेल, तुमचा पक्षही कोणीतरी फोडेल'; महाराष्ट्रातील राजकारणावरून CM Mamata Banerjee यांचे BJP वर टीकास्त्र)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काल आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची ऑफर दिली. आज शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे गटाने 24 तासात परत यावे, असेही ते म्हणाले. नुकतेच त्यांनी एक ट्वीट करत, ‘चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ’, अये म्हटले आहे.