देशात गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षांची भाजपविरुद्ध (BJP) खलबते चालू आहेत. केंद्रातील भाजपची सत्ता पाडण्यासाठी विरोधी पक्ष एकजुटले आहेत. यामध्ये शिवसेनादेखील (Shiv Sena) सामील होती. परंतु आता सेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे पक्षाला मोठे खिंडार पडले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आमदारांच्या गटाचा गुवाहाटी येथे मुक्काम आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींवर देशातील बड्या नेत्यांनी भाष्य केले आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या म्हणतात, ‘आम्हाला उद्धव ठाकरे आणि इतरांसाठी न्याय हवा आहे. आज (भाजप) तुम्ही सत्तेत आहात आणि पैसा, मसल, माफिया शक्ती वापरत आहात. पण एक दिवस तुम्हालाही जावे लागेल. तुमचा पक्षही कोणीतरी फोडू शकतो. तुम्ही जे करत आहात ते हे चुकीचे आहे आणि मी त्याचे समर्थन करत नाही.’
Instead of Assam, sent them (rebel MLAs) to Bengal. We'll give them good hospitality...After Maharashtra, they will topple other governments also. We want justice for people, constitution: West Bengal CM Mamata Banerjee
— ANI (@ANI) June 23, 2022
त्या पुढे म्हणाल्या, ‘आसामऐवजी बंडखोर आमदारांना बंगालमध्ये पाठवावे. आम्ही त्यांचे चांगले आदरातिथ्य करू. महाराष्ट्रानंतर भाजप इतर सरकारही पाडेल. आम्हाला लोकांसाठी, संविधानासाठी न्याय हवा आहे.’ (हेही वाचा: 'राज्यात असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेसोबत, सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाणार नाही'; राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका)
दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सोडला व ते सुरतला गेले. तिथून ते गुवाहाटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट अजूनही आपल्या मतावर ठाम असून, उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची साथ सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडले आहे. राऊत म्हणतात, ‘चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!’