Nana Patole | (Photo Credits: Facebook)

कोरोना काळात (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) लोकांवर आधीच उपासमारीची वेळ आलेली असताना केंद्र सरकारने (Central Government) खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे बळीराजा पुरता संकटात अडकला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा पुढच्या आठवड्यापासून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता पिळवटून गेली आहे. त्यातच तौक्ते चक्रीवादळाचा फटका शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढल्याने उदरनिर्वाह करायचा कसा असा मोठा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे. आधीच संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.हेदेखील वाचा- Tauktae Cyclone मुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी CM Uddhav Thackeray आज रत्नागिरी, सिंधुदुर्गात; पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर करण्याची केली घोषणा

कोरोनाचे सर्व नियम पाळून घंटानाद आंदोलन करण्यात येईल. हे टाळ्या-थाळ्यांचं आंदोलन नसेल. झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. त्यांना तिकडे जायला वेळ आहे. पण महाराष्ट्रात येत नाहीत, अशी टीका करतानाच नियम शिथील करून कोकण किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.