'आनंद दिघे यांच्याबाबत जे घडले त्याचा मी साक्षीदार, मी तोंड उघडले तर भूकंप होईल'- CM Eknath Shinde
Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनच्या (Shiv Sena) 40 आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णतः बदलले. सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दिवसेंदिवस या दोन्ही नेत्यांमधील वाद चिघळू लागला आहे. आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. ‘जर मी तोंड उघडले तर भूकंप होईल. आनंद दिघे यांच्याबाबत जे घडले त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यावर सांगेन,’ असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारपासून महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत, आज ते मालेगावमध्ये होते. यावेळी त्यांनी सभेला संबोधित केले. सीएम शिंदे म्हणाले, 'धर्मवीर हा चित्रपट फक्त ट्रेलर आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत जे घडले त्याचा मी साक्षीदार आहे. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. याबाबत मी आज काही बोलणार नाही, पण ते आमच्याबाबत अधिक बोलले तर दिघे साहेबांसोबत जे काही घडले ते मी सर्व काही उघडे करेन. मी तोंड उघडले तर भूकंप होईल.’

ते पुढे म्हणाले, ‘एक काळ असा होता की आनंद दिघे यांची लोकप्रियता ठाणे आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जवळपास इतकीच होती जितकी बाळासाहेब ठाकरेंची लोकप्रियता मुंबई आणि राज्यातील शहरी भागात होती. आनंद दिघे यांची हत्या झाली. आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य गमावले.’ आनंद दिघे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे राजकीय गुरू होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आमच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. पण आम्ही गद्दार नाही. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे चाललोय. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कधी युती करणार नाही, तशी वेळ आली तर आम्ही आमचे दुकान बंद करु असे बाळासाहेब म्हणाले होते. परंतु तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले, यावरून कोण गद्दार ते समजा,’ (हेही वाचा: 'ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री', एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे बरसले)

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘शिंदे गट फुटला, त्याची खंत नाही, पण आता ते स्वतःची ओळख का बनवत नाहीत, माझ्या वडिलांच्या नावाचा वापर का करत आहात? स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतदान करा. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘शिवसेना स्वबळावर इथपर्यंत पोहोचली का? शिवसेनेला पुढे नेण्यासाठी आपण 16 वर्षे रक्त आणि घाम गाळला आहे. शिवसेनेला पुढे नेण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कार्यकर्त्यांना तयार केले, त्या कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना इथपर्यंत पोहोचली आहे.’