'मी कोणत्या नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो'; पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावर CM Uddhav Thackeray यांची प्रतिक्रिया
CM Uddhav Thackeray | (Photo Credit: You Tube)

कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण, लसीकरणासह अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ही बैठक राजकीय नसून वैयक्तिक होती. पंतप्रधानांशी त्यांचे चांगले संबंध आहेत असे सांगण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा माध्यमांनी त्यांना पीएम मोदी यांच्या भेटीविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांना भेटण्यात काय चूक आहे, मी कोणत्या नवाझ शरीफला तर भेटायला गेलो नव्हतो.’

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘आम्ही जरी राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी याचा अर्थ असा नाही की आमचे नाते तुटले आहे. त्यामुळे जर का मी पंतप्रधानांची वैयक्तिकरित्या भेट घेतली तर त्यात चूक काय आहे.’ पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत दिल्लीत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण, कोरोना संकट आणि तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची स्वतंत्रपणे 10 मिनिटे भेट घेतली, यामुळेच अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी महाराष्ट्राच्या समस्या पीएम मोदींच्यासमोर ठेवल्या आणि ही बैठक अतिशय सकारात्मक घडली. लस धोरणात बदल केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्हाला 18 ते 4 वयोगटातील 6 कोटी लोकांना लसी देण्यासाठी 12 कोटी डोसची आवश्यकता होती. पुरेसा आणि स्थिर पुरवठा होत नसल्याने आम्ही प्रयत्न करूनही त्याला यश मिळू शकले नाही. आता पंतप्रधानांनी केंद्रावर लसीकरणाची सर्व जबाबदारी घेतली आहे, म्हणून आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो आणि आशा करतो की येणारे अडथळे दूर होतील आणि लवकरात लवकर सर्वांना लस दिली जाईल.’

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, 'आम्ही पंतप्रधानांकडे महाराष्ट्राबाबत अनेक मागण्या केल्या. मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली आहे. एससी/एसटी पदोन्नती आरक्षणाविषयी चर्चा झाली. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमध्ये जमीन द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जीएसटी परतावा वेळेवर मिळावा याची काळजी घेण्याची विनंती आम्ही पंतप्रधानांना केली आहे.’

याशिवाय उद्धव ठाकरे सरकारने एनडीआरएफच्या तरतुदींमध्ये बदल करण्याची मागणीही केली. या व्यतिरिक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अनेक कागदपत्रे यापूर्वी पाठविली आहेत आणि गरज पडल्यास आवश्यक कागदपत्रे पाठविली जातील, असे सीएम उद्धव ठाकरे म्हणाले.