सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यात अनेकदिवस उद्योगधंदे बंद होते, या काळात अनेकांचे व्यवसाय बंद झाले, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आता राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्यासाठी सरकारने ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल (Mahajobs Portal) सुरु केले आहे. 6 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. राज्यात अनलॉक अंतर्गत जे उद्योग सुरु झाले आहेत, त्यांना कामगारांचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.
रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी या पोर्टलवर नक्की नोंदणी कशी करावी याबाबत आम्ही माहिती देत आहोत. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन; 'ही' आहेत Mahajobs ची प्रमुख वैशिष्ट्ये)
अशी करा नोंदणी -
- सर्वात प्रथम ‘महाजॉब्स’च्या https://mahajobs.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला लॉगइनचा रकाना दिसेल तिथे तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा.
- त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने पोर्टलवर नोंदणी होईल.
- त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती भरावी लागेल. याबरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहितही देवू शकता.
- हे सर्व झाल्यावर दिसत असलेला कॅपच्या (captcha) अचूकपणे भरा व सबमिट करा.
- तुम्ही नोंदणी करुन सवमिट केल्यानंतर 'Registration done successfully' असा मेसेज येईल.
ही कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे-
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- कौशल्य प्रमाणपत्र
- फोटो
महाजॉब पोर्टलसंबंधी कोणत्याही मदतीसाठी आपण ग्राहक सेवा नंबरवर फोन करू शकता- 022-61316405
दरम्यान, उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. या महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी 17 क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यातील 950 व्यवसायांसाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात.