![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Chief-Minister-Uddhav-Thackeray1-380x214.jpg)
संपूर्ण देशावर आलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) या महाभयाण संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत अनेक जण बेरोजगारही झाले आहेत. यामुळे जगायचे कसे आणि कुटूंब चालवायचे कसे असा मोठा प्रश्न अनेक बेरोजगारांसमोर उभा ठाकला आहे. अशातच एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र सरकारने अशा लोकांना आशेचा किरण म्हणून 'महाजॉब्स' हे संकेतस्थळ सुरु केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. महाजॉब्स (Mahajobs) हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणार्यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे.
राज्य सरकारच्या mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत होईल. कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टीकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे महाजॉब्सचे लक्ष्य आहे.
या पोर्टलची प्रमुख उद्दिष्ट्ये कोणती?
नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असणार असल्याचे मुख्यमंत्री या वेबपोर्टलच्या उद्घाटनावेळी सांगितले.