Local train service (Photo Credits-ANI)

मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सर्वसामान्यांना प्रवास करता यावा, यासाठी ऑफलाईन कोविड-19 लसीकरण पडताळणी प्रक्रिया आणि रेल्वे पास वितरण प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता ऑनलाईन ई-पास सुविधा (Mumbai Local Train Online Pass) सुरु करण्यात आली आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास (Universal Travel Pass)असे या पासला नाव देण्यात आले आहे. या पद्धतीमुळे नागरिकांना प्रवासासाठी अतिशय सुलभतेने ई-पास मिळवता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ई-पास सुविधेनुसार, ज्या नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच दुसरा डोस घेऊन किमान 14 दिवस उलटले आहेत, अशा नागरिकांना ई-पास मिळणार आहे. जे पात्र नागरिक ई-पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळी या लिंकवर आपोआप होईल. यासाठी वेगेळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता भासणार नाही. महत्वाचे म्हणजे, ज्या नागरिकांनी कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. परंतु, त्यांना 14 दिवस पूर्ण झाले नाहीत, अशा नागरिकांना दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर ई-पास उपलब्ध होईल. हे देखील वाचा- Maharashtra Unlock: मुंबई लोकल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानदारांना मोठा दिलासा, राज्यात आजपासून काय सुरु आणि काय बंद? घ्या जाणून

ई-पास मिळवण्यासाठी कसा अर्ज करायचा?

 

- ई-पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम https://epassmsdma.mahait.org या लिंकवर भेट द्या.

-त्यानंतर कोविड लसीकरणासाठी नोंदवलेला मोबाईक क्रमांक नमूद करा.

- ताबडतोब या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

- ओटीपी नमूद केल्यानंतर संबंधित नागरिकांची संपूर्ण माहिती दिसेल. (नाव, मोबाईल क्रमांक, इतर माहिती)

- त्यानंतर जनरेट पास पर्यायावर क्लिक करा.

- यावर क्लिक करताच अर्जदाराची माहिती तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांकासह इत्यादी माहिती दिसेल.

- त्यानंतर अर्जदाराला सेल्फ इमेजमध्ये पर्यायामध्ये जाऊन स्वत:चा फोटो अपलोड करावा लागणार आहे. सेल्फीचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

- ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला पुढील 48 तासाच्या आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता मॅसेजद्वारे लिंक पाठवली जाणार.

- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये जतन करून उपनगरीय रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करा.

- त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येणार आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, पडताळणी प्रक्रियेसाठी कृपया रेल्वे स्थानकावर गर्दी न करता, टप्प्या-टप्याने जाऊन अथवा ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करून पडळताणी पूर्ण करावी.