building

हीरानंदानी समूह (Hiranandani Group) हे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. या समूहाची स्थापना 1978 साली मुंबई येथे डॉ. निरंजन हीरानंदानी आणि सुरेंद्र हीरानंदानी यांनी केली. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळात, समूहाने मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले आहेत. समूहाने निवासी, व्यावसायिक, आरोग्यसेवा, शिक्षण, ऊर्जा आणि आदरातिथ्य क्षेत्रांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. मुंबई आणि ठाणेकरांना आकर्षित केल्यानंतर, आता निरंजन हिरानंदानी ग्रुप पुण्याच्या मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. हिरानंदानी ग्रुप क्रिसला डेव्हलपर्ससोबतच्या धोरणात्मक संयुक्त विकास कराराद्वारे पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये उतरत आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी स्थान पुण्यातील टेक हब हिंजवडी येथे नवीन प्रकल्प उभारणार आहे. या  एकात्मिक टाउनशिप पॉलिसी अंतर्गत, उत्तर हिंजवडीमध्ये तब्बल 105 एकर जमीन निवासी, व्यावसायिक आणि किरकोळ वापरासाठी विकसित केली जाईल. या जमिनीच्या मालमत्तेचे एकूण गुंतवणूक मूल्य 2000 कोटी रुपये आहे, ज्यातून भविष्यातील उत्पन्न 70000 कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. प्रकल्पाच्या 30 एकरच्या पहिल्या टप्प्यात अंदाजे 20 लाख चौरस फूट रिअल इस्टेट जागा मिळेल असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यातच अंदाजे 500 कोटी रुपये गुंतवले जातील आणि ज्यातून 2,100 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

नियोजित प्रकल्पात अपार्टमेंट, व्हिला प्लॉट, ब्रँडेड घरे आणि खरेदीदारांना संपूर्ण राहणीमानाचा अनुभव देण्यासाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा समावेश असेल. हिरानंदानी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी या प्रकल्पावर भाष्य करत, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांच्या उपक्रमांमुळे रिअल इस्टेटवर कसा परिणाम होतो यावर भर दिला.

ते म्हणतात, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमधील रिअल इस्टेट वाढीला दोन्ही शहरांमधील सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे चालना मिळत आहे. पुण्यातील भरभराटीचे आयटी हब, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि कुशल व्यावसायिकांच्या आगमनामुळे अभूतपूर्व विकासाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतीय रिअल इस्टेट उद्योगात शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी, त्यांनी नावीन्यपूर्णता आणि धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व देखील अधोरेखित केले. (हेही वाचा: Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: एमएसआरडीसी पुन्हा सुरु करणार नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन सर्वेक्षण; नागरिकांचा निषेध कायम)

दरम्यान, समूहाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये मुंबईतील हिरानंदानी गार्डन्स, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मीडोज, तसेच हैदराबादमधील हिरानंदानी लॉफ्टलाइन यांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रात, समूहाने हिरानंदानी फाउंडेशन स्कूल्स आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी यांची स्थापना केली आहे.