Mumbai College Bans Hijab For Degree Students: मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) येथील आचार्य मराठे महाविद्यालयाने (Acharya Marathe College) मुस्लीम महिलांना हिजाब, बुरखा घालण्याची बंदी आता पदवी स्तरापर्यंत वाढवली आहे. यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अशीच बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. याबाबत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची प्रतिक्रिया समोर येत असून, त्यांनी कॅम्पसमध्ये हिजाब आणि बुरखा बंदीबाबत दावा केला आहे की, या आदेशाचा उद्देश कॅम्पस प्लेसमेंट सुधारणे आणि विद्यार्थ्यांमध्ये 'शिष्टाचार' स्थापित हा करणे आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या चेंबूर येथील एनजी आचार्य आणि डीके मराठे शाळा आणि महाविद्यालयाने, ड्रेसकोड लागू करत पुरूष विद्यार्थ्यांनी पूर्ण किंवा हाफ शर्ट आणि ‘सामान्य’ ट्राऊझर घालणे आवश्यक आहे, तर महिला विद्यार्थिनी या ‘भारतीय किंवा पाश्चात्य’ असा कोणताही मात्र ‘नॉन-रिव्हलिंग फुल फॉर्मल ड्रेस’ घालून येतील, असे सांगितले आहे. विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश करताच ‘बुरखा, निकाब, हिजाब, बिल्ला, टोपी यांसारख्या धर्माशी निगडीत बाबी एका खोलीत काढून ठेवण्यात, असेही निर्देशात म्हटले आहे. कॉलेजच्या या निर्णयाला मुस्लीम विद्यार्थिनींचा विरोध होत आहे.
कॉलेजचे स्पष्टीकरण-
याबाबत कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सरचिटणीस आणि शिवसेना (UBT) नेते सुबोध आचार्य यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, ‘हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आम्हाला कॉलेज प्लेसमेंट वाढवायचे आहे. विद्यार्थी बुरख्यात नोकरी मागायला गेले तर त्यांचा विचार केला जाईल का? विद्यार्थ्यांनी समाजात कसे राहावे आणि कसे वागावे, याबाबतची मूल्ये आणि शिष्टाचार आत्मसात केले पाहिजे.’
शहरातील इतर पदवी महाविद्यालयांमध्ये असे कोणतेही बंधन नसताना धार्मिक पोशाखांवर बंदी घालण्याची गरज महाविद्यालयाला का वाटली?, असे विचारले असता आचार्य म्हणाले, ‘आमचे विद्यार्थी गरीब कौटुंबिक पार्श्वभूमीतील आहेत. त्यांना समाजात स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे.’ आचार्य पुढे म्हणाले की या विषयाला 'धार्मिक रंग' देऊ नये. त्यांनी हिजाब घालण्याच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहाला ‘अतिवाद’ म्हटले. ते म्हणाले, ‘तुम्हाला शिक्षकाने विद्यार्थ्याचा धर्म त्यांच्या कपड्यांवरून ओळखावा असे वाटते का? विविधतेचा विचार तुम्ही कुठपर्यंत नेणार? हा मनुवाद किती दिवस चालवणार? ही एक अतिरेकी विचारसरणी आहे. मी याच्या विरोधात आहे.’ (हेही वाचा: Hijab Ban For Degree Students: चेंबूर कॉलेजमध्ये आता पदवीच्या विद्यार्थिनींसाठीही हिजाब, नकाब आणि बुरखावर बंदी; मुलींची ड्रेस कोडबाबत पुनर्विचार करण्याची विनंती)
मात्र अनेक मुलींनी कॉलेजची हिजाब बंदीची कारणे पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले. त्या म्हणतात, एक तर सर्व मुलींना प्लेसमेंटमध्ये भाग घ्यायचा नाही. त्यांच्यापैकी अनेकांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे. अनेक महिला धार्मिक पोशाख घालून काम करतात. त्यामुळे कॉलेज जी कारणे देत आहे त्यात काही तथ्य नाही.