Hijab Ban For Degree Students: चेंबूर कॉलेजमध्ये आता पदवीच्या विद्यार्थिनींसाठीही हिजाब, नकाब आणि बुरखावर बंदी; मुलींची ड्रेस कोडबाबत पुनर्विचार करण्याची विनंती
Hijab (File Image)

Mumbai College Bans Hijab For Degree Students: मुंबईच्या (Mumbai) चेंबूर (Chembur) येथील एनजी आचार्य आणि डीके मराठे शाळा आणि महाविद्यालयाने (N.G.Acharya & D.K.Marathe College) काही महिन्यांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात बुरखा आणि हिजाब घालण्यास बंदी घातली होती. तसेच हिजाब आणि बुरखा परिधान केलेल्या विद्यार्थिनींना शाळेच्या गेटवरच थांबवण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयातील मुस्लिम मुलींना कॅम्पसमध्ये हिजाब आणि बुरखा घालण्यास मनाई केल्यानंतर, आता पदवी महाविद्यालयातही हा नियम लागू केला जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, कॉलेजने एक 'ड्रेस कोड' सादर केला होता, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच, धार्मिक महत्त्व असलेले कपडे उघडपणे घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. विशेषत: यामध्ये हिजाब, नकाब आणि बुरखा यांचा उल्लेख होता.

संस्थेच्या या निर्देशानंतर मोठ्या संख्येने मुस्लिम विद्यार्थिनी दुखावल्या गेल्या. महाविद्यालय त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, महाविद्यालयाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या (वरिष्ठ माध्यमिक विभाग) हिजाब आणि बुरखा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. प्रशासनाने गेल्या 45 वर्षांत प्रथम ड्रेसकोड लागू केला होता, ज्याद्वारे मुलांना शर्ट आणि ट्राऊझर तर मुलींना सलवार, कमीज आणि जॅकेटची सक्ती केली गेली.

विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर, महाविद्यालयाने त्यांना हिजाब, निकाब आणि बुरखा घालून परिसरात प्रवेश करण्यास परवानगी दिली, परंतु वर्गात जाण्यापूर्वी या बाबी काढण्यास सांगण्यात आले. या कारवाईमुळे अनेक मुस्लिम मुलींनी कॉलेज सोडले होते. आता विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रसारित झालेल्या, उच्च वर्गांसाठीच्या नवीन सूचनांमध्ये, संस्थेने म्हटले आहे की- ‘जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना विद्यार्थ्यांनी फक्त 'औपचारिक' आणि 'सभ्य' कपडे परिधान करावेत. पुरूष विद्यार्थ्यांनी पूर्ण किंवा हाफ शर्ट आणि ‘सामान्य’ ट्राऊझर घालणे आवश्यक आहे, तर महिला विद्यार्थिनी या ‘भारतीय किंवा पाश्चात्य’ असा कोणताही मात्र ‘नॉन-रिव्हलिंग फुल फॉर्मल ड्रेस’ घालून येतील.’ (हेही वाचा: Chicken in Paneer Biryani: पनीर बिर्याणीमध्ये आढळले चिकनचे तुकडे, धार्मिक भावना दुखावल्याची ग्राहकाकडून तक्रार; Zomato ची तत्काळ प्रतिक्रिया)

विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश करताच ‘बुरखा, निकाब, हिजाब, बिल्ला, टोपी यांसारख्या धर्माशी निगडीत बाबी एका खोलीत काढून ठेवण्यात, असेही निर्देशात म्हटले आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ड्रेस कोड आठवड्यातून एकदा गुरुवारी शिथिल केला जाईल. यानंतर अनेक मुस्लीम विद्यार्थिनींनी त्यांच्या पारंपरिक पोशाखावरील निर्बंधांवर आक्षेप घेतला आहे. सोमवारी, 30 विद्यार्थ्यांनी कॉलेजला पत्र सादर केले आणि कोणताही ड्रेस कोड लागू करण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. महिला विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगाकडेदेखील तक्रारी दाखल केल्या आहेत.