
पूर्वेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात सध्या तापमानात (Maharashtra Temperature) वाढ होत असलेली दिसून येत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मुंबईसह अनेक ठिकाणी उष्ण हवामान पाहायला मिळेल. हवामानशास्त्रज्ञांनी येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक शहरांमध्ये आणखी उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी सांताक्रूजमध्ये कमाल तापमान 37.2 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले, जो सामान्यपेक्षा 5.9 डिग्री अधिक होते. पुढील दोन दिवस राज्यातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा-
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून, आज आणि उद्या (25-26 फेब्रुवारी) मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या पालघर जिल्ह्यालाही उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37°C आणि 22°C च्या आसपास असेल. यासह पुण्यातील दिवसाच्या तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत पारा 2-3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईमधील पाणीसाठा निम्म्यावर-
दुसरीकडे कडक उन्हामुळे आधीच मुंबईकर त्रस्त होते, आता या अतिउष्णतेने जलसंकट वाढले आहे. मुंबई महापालिकेला (BMC) पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. सध्याची पाणीपातळी 7,47, 436 दशलक्ष लिटर इतकी कमी झाली आहे, त्यामुळे पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार जलाशयातून दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या वार्षिक गरजांसाठी या जलाशयांमध्ये 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असायला हवा, परंतु सध्याचा साठा ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. (हेही वाचा: Pune Temperature Update: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज; काळजी घेण्याचा सल्ला)
उष्णतेपासून घ्या स्वतःची काळजी-
- सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहणे गरजेचे आहे.
- अतिउष्णतेच्या परिस्थितीत हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.
- भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे.
- पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत.
- उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करावा.
- ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे.
- थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
- सूर्यप्रकाशात उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.