![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/5555555.jpg?width=380&height=214)
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे (Pune Guillain-Barre Syndrome) चार नवीन रुग्ण आढळले आहेत, यामुळे महाराष्ट्रातील या आजाराची एकूण रुग्णसंख्या 170 वर पोहोचली आहे. बुधवारपर्यंत जीबीएसमुळे पाच संशयितांचा मृत्यू झाला आहे. या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) पुण्यातील जीबीएस साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करत आहे. प्रामुख्याने हा आजार दुषित पाण्यामुळे होत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे गेले काही दिवस पुण्यात विविध भागात रहिवासी वापरत असलेल्या पाण्याची तपासणी सुरू आहे. या दरम्यान आता पुणे महानगरपालिकेने (PMC) पुणे शहरातील सिंहगड रोडवरील नांदेड गाव, धायरी आणि लगतच्या भागात 30 खाजगी पाणीपुरवठा प्रकल्प सील केले आहेत.
या भागांना साथीचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहे. गेल्या दोन दिवसांत या प्लांटवर कारवाई करण्यात आली, असे पीएमसीच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. पिण्यासाठी अयोग्य आढळलेल्या पाण्याचे नमुने गोळा केल्यानंतर पीएमसीने या प्लांटवर कारवाई केली. काही प्लांटना चालवण्यासाठी योग्य परवानगी नव्हती, तर काहींच्या ठिकाणाचे पाणी एस्चेरिचिया कोलाई बॅक्टेरियाने दूषित होते. याव्यतिरिक्त, काही प्लांट प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जंतुनाशक आणि क्लोरीन वापरत नव्हते.
पीएमसी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले की, परिसरात कार्यरत असलेल्या काही खाजगी आरओ वॉटर प्लांटसह या पाणीपुरवठा प्लांटवर कारवाई करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने गोळा केल्यानंतर, जिथले पाणी पिण्यास अयोग्य आढळले त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. जगताप यांनी पुढे माहिती दिली की, हे प्लांट्स तात्पुरते सील करण्यात आले आहेत. या खाजगी जलस्रोतांचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आणि परिसरात दूषित पाण्याचे वितरण रोखण्यासाठी पीएमसी एक मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करत आहे. (हेही वाचा: Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यात आता सीलबंद पाण्याचे कॅन आणि बाटल्याही सुरक्षित नाहीत; RO प्लांटमधील पाण्यात आढळले बॅक्टेरिया)
दूषित पाणीपुरवठ्यावर पीएमसीने केलेली ही कारवाई साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. दुसरीकडे, पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, जगातील आरोग्य संघटनेची टीम तांत्रिक आणि प्रत्यक्ष फील्ड सपोर्ट देत आहेत. ते परिसरातील सक्रिय केस सर्चमध्ये आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संशयित जीबीएस रुग्ण ओळखण्यास आणि त्यांच्यावर उपचार करण्यास मदत करत आहेत.